Jalana Maratha Reservation Protest: जालना येथे मराठा आंदोलकांवर लाठीचार्ज करण्यात आला. याचे पडसाद आता राज्यभर उमटले आहेत. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनी जालन्यात आंदोलकांची भेट घेतली. मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीचार्ज नंतर या दोन्ही नेत्यांनी आंदोलकांना धीर दिला.
उदयनराजेंनी जालन्यात आंदोलकांची भेट घेतलीयेत. यावेळी अंतरवाली सराटी गावात जाऊन उदयनराजेंनी आंदोलकांशी बातचित करत त्यांना धीर दिलाय. यावेळी मराठा आंदोलकांसह उदयन राजेंनी चर्चा केली. घटना का घडली याचे सरकारने स्पष्टीकरण द्यावं असं आव्हान उदयनराजे यांनी सरकारला केले. यावेळी उदयन राजे यांच्यासह शरद पवार देखील मंचावर उपस्थित होते.
शरद पवारांनी भेट लाठीचार्जमध्ये जखमी झालेल्या आंदोलकांशी त्यांनी बातचित केली. शांततेच्या मार्गाने संघर्ष करण्याचं आवाहन शरद पवारांनी मराठा आंदोलकांना केलंय..
ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी लाठीचार्जवरून सरकारवर निशाणा साधलाय. सरकारला जाती-पातीवरून दंगली घडवायच्या आहेत. याचीच ही ठिणगी जालन्यात पडल्याचं राऊतांनी म्हटलंय. तर मुंबईतील इंडिया आघाडीच्या बैठकीवरील लक्ष हटवण्यासाठी हा लाठीहल्ला झाल्याचा गंभीर आरोप राऊतांनी केला. या प्रकरणात सरकारच दोषी असून, मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी केलीय.
संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यातील सरपंच मंगेश साबळे यांनी स्वतःच्या गाडीवर पेट्रोल टाकून मराठा आंदोलकांना झालेल्या मारहाणीच्या घटनेचा निषेध नोंदवलाय. साबळे हे वेगवेगळे आंदोलन करून नागरिकांचं लक्ष वेधून घेत असतात. याआधी गटविकास अधिकाऱ्यानी विहिर मंजूरीसाठी लाच मागितल्यानं त्यांनी फुलंब्री पंचायत समिती समोर नोटा फेकूनआंदोलन केलं होतं. यानंतर काल जालन्यात मराठा आंदोलकांना पोलिसांनी मारहाण केली याचा निषेध म्हणून साबळे यांनी स्वतःच्या कारवर पेट्रोल टाकून कार पेटवली आणि आंदोलकांना झालेल्या मारहाणीचा निषेध नोंदवला.