पुण्यात मराठा क्रांती मोर्चा आक्रमक, गुणरत्न सदावर्ते यांचा निषेध

गुणरत्न सदावर्ते पोलीस ठाण्यात हजर झाले आणि काही वेळातच मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी पोलीस ठाण्याबाहेर जमून निषेधाच्या घोषणा दिल्या.

Updated: May 5, 2022, 12:29 PM IST
पुण्यात मराठा क्रांती मोर्चा आक्रमक, गुणरत्न सदावर्ते यांचा निषेध title=

पुणे : खासदार छत्रपती संभाजी ( Chatrapati Sambhaji ) यांच्याविरोधात आक्षेपार्ह विधान करणारे वकील गुणरत्न सदावर्ते ( Gunratn Sadavarte ) यांच्याविरोधात पुण्यात मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले.

गुणरत्न सदावर्ते यांच्यावर भारती विद्यापीठ ( Bharti Vidyapith ) पोलिस ठाण्यात छत्रपती शिवाजी महाराज ( Shivaji Maharaj ) यांच्या वंशजांची बदनामी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे.

त्या प्रकरणात हजर राहण्यासाठी पोलिसांनी गुणरत्न सदावर्ते यांना नोटीस बजावली होती. त्यानुसार गुणरत्न सदावर्ते यांनी पोलीस ठाण्यात हजेरी लावली. यावेळी पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला होता.

गुणरत्न सदावर्ते पोलीस ठाण्यात हजर झाले आणि काही वेळातच मराठा क्रांती मोर्चाच्या ( Marath Kranti Morcha ) कार्यकर्त्यांनी पोलीस ठाण्याबाहेर जमून निषेधाच्या घोषणा दिल्या.

छत्रपती यांच्या घराण्याबाबत आक्षेपार्ह विधान करून गुणरत्न सदावर्ते यांनी छत्रपती यांच्या गादीचा अपमान केला आहे. त्यांनी मराठा आरक्षणाबाबत जे राजकारण केले त्याचा मराठा क्रांती मोर्चाने निषेध केला.

या आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी 'एक मराठा, लाख मराठा' घोषणा दिल्या. यावेळी आंदोलन कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. यावेळी कार्यकर्त्यांनी पोलिसांनी दडपशाही केली असून आम्ही लोकशाही मार्गाने निषेध व्यक्त करत होतो. आमचे आंदोलन शांततेने सुरु असताना पोलिसांनी वातावरण तापवले, असा आरोप मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी केला.