Maratha Reservation Mumbai Morcha: मराठा आऱक्षणाच्या मागणीसाठी मुंबईच्या दिशेने निघालेले मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी स्वत: चर्चेला यावं आणि तोडगा काढावा अशी विनंती केली आहे. तोडगा निघत नाही तोवर थांबणार नसल्याचा इशाराही मनोज जरांगे यांनी दिला आहे. आम्हाला आंदोलन करायचं आहे, पण तोडगाही काढायचा आहे. म्हणून लोणावळ्यात थांबलो होतो. पण आता आम्ही थांबणार नाही असा इशारा मनोज जरांगे यांनी दिला आहे. आझाद मैदानात आमरण उपोषण सुरु झाल्यानंतर जरी तोडगा निघाला तरी माघार घेऊ असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.
"त्यांचं शिष्टमंडळ भेटायला येणार आहे. त्यात काय असेल ते पाहावं लागेल. आम्हाला आरक्षणाचा गुलाल उधळायचा आहे. मुद्दामून काही वेगवेगळे विषय काढले जात आहेत. मी थांबू शकत नाही. आम्ही चालत राहणार असून शिष्टमंडळ जिथे थांबेल तिथे त्यांना भेटू. आम्ही मुंबईच्या दिशेने चालत जाणार आहेत. ते आले तर एखादं घर किंवा हॉटेलात थांबू," असं मनोज जरांगे म्हणाले आहेत.
"मी ही विनंती करणार नव्हतो, पण मला तोडगा काढायचा आहे. आम्ही मजा करायला आलेलो नाही. आमचे लोक वाऱ्यात, थंडीत कुडकुडत आहेत. मुंबईप्रमाणे आमचेही हाल होत आहेत. दोघांचेही हाल होऊ न देणं हे सरकारच्या हातात आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांनी प्रत्यक्ष चर्चेला येऊन तोडगा काढावा अशी समाजाच्या वतीने शेवटची विनंती आहे. आम्हालाही मुंबईत येण्याची हौस नाही. अन्यथा मुंबईच्या दिशेने येत आहे. त्यांनी येऊन लगेच तोडगा काढावा," असा इशारा मनोज जरांगे यांनी दिला आहे. पुढे ते म्हणाले, तिघं मिळून या किंवा एकाने या, पण यात लक्ष घाला ही समाजाच्या वतीने विनंती आहे.
शिष्टमंडळ नसून फक्त अधिकारी आहेत. ते फक्त माहिती देण्यासाठी आले आहेत असं सांगत त्यांनी बंद दाराआड चर्चा झाल्याचा दावा फेटाळला.