राज्यात मराठा आंदोलनाचा प्रश्न पुन्हा एकदा पेटला आहे. मनोज जरांगे हे सध्या अनेक ठिकाणचा दौरा करत असून यानिमित्ताने मराठा आरक्षणाची मागणी जोर धरत आहे. यादरम्यान केंद्रीय मंत्री भारती पवार यांच्या अमृत कलश यात्रेत मराठा आंदोलकांनी गोंधळ घातला आहे. नाशिकमधील नांदगाव येथे कार्यक्रम सुरु असताना आंदोलकांनी त्यात गोंधळ घातला. यावेळी भारती पवार यांना काळे झेंडे दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला.
केंद्रीय मंत्री भारती पवार यांचा नाशिकमधील नांदगावात कार्यक्रम सुरु होता. अमृत कलश यात्रेनिमित्त त्या भाषण करत असतानाच मराठा आंदोलकांनी घोषणा देण्यास सुरुवात केली. मराठा आंदोलकांनी आधी आमच्याशी बोला असा आग्रह धरला. यादरम्यान व्यासपीठासमोर 'एक मराठा लाख मराठा ' अशी घोषणाबाजी करण्यात आली. यानंतर भारती पवारांनी व्यासपीठावरूनच आंदोलकांचे कान टोचले. शहिदांच्या स्मरणार्थ होणाऱ्या या कार्यक्रमात गोंधळ घालणं चुकीचं असल्याचं त्या म्हणाल्या. पोलिसांनी घोषणाबाजी करणाऱ्या आंदोलकांना ताब्यात घेतलं आहे.
याआधी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंच्या कार्यक्रमातही मराठा आंदोलक (Maratha आणि पोलिसांमध्ये धक्काबुक्की झाली. बदनापूरमध्ये 'मेरी माटी मेरा देश' या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आल होतं. या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे (RaoSaheb Danve) आणि मंत्री अतुल सावे यांनी उपस्थिती लावली. मात्र मराठा आंदोलकाने आत्महत्या केली असल्याने हा कार्यक्रम करू नये अशी मागणी आंदोलकांनी केली. यावेळी मराठा आंदोलक आणि पोलिसांमध्ये धक्काबुक्की झाली. पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतल्यानंतर समज देत सोडलं. आरक्षण मिळेपर्यंत एकही शासकीय कार्यक्रम होऊ देणार नसल्याचा इशारा आंदोलकांनी दिला आहे.
मराठा आरक्षण प्रकरणी मनोज जरांगेंनी (Manoj Jarange-Patil) घेतलेल्या आक्रमक भूमिकेची झळ आता पवार काका-पुतण्यांनाही बसलीय. येत्या 23 ऑक्टोबरला सोलापुरात पिंपळनेर साखर कारखान्याच्या कार्यक्रमासाठी अजित पवार येणार आहेत. मात्र अजित पवारांना पिंपळनेरमध्ये येऊ देणार नाही, अशी भूमिका सकल मराठा समाजानं घेतलीय. तर त्याचदिवशी माढा तालुक्यातील कापसेवाडीत शरद पवार (Sharad Pawar) द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांची बैठक घेणार आहेत. मात्र पवारच काय, कुणाही नेत्याला सोलापुरात येऊ देणार नाही, असा इशारा मराठा क्रांती मोर्चानं दिला आहे.
मी माझ्या जीवनात इतकं निष्ठुर सरकार कधीच पाहिलेलं नाही. एक समिती स्थापन केली. हैदराबादला जातील, मुंबईला जातील…काय करतात माहिती नाही. पाच हजार पुरावे सापडले आहेत. तुमच्या छाताडावर बसून आम्ही आरक्षण घेऊ. मराठा मागास सिद्ध असूनही आरक्षण नाही. 22 तारखेला पुढील आंदोलनाची दिशा सांगणार असं मनोज जरांगे यांनी स्पष्ट केलं आहे.