Marathi Compulsory: पहिली ते दहावीमध्ये माध्यमात मराठी या आधीच सक्तीची करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर उच्च आणि तंत्रशिक्षण विभागातील इंजिनीअरिंगमध्येही मराठी सक्तीची करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. शालेय शिक्षण विभागाने हा मोठा निर्णय घेतला आहे. विश्व मराठी संमेलन 2024 हे वाशी येथे सुरु असून शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी या मंचावरुन घोषणा केली. यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरेदेखील उपस्थित होते.
यावेळी केसरकर यांनी राज ठाकरेंची स्तुती केली. राज ठाकरे यांचे भाषण आणि वक्तृत्व सर्वांसाठी आकर्षण असतं. आम्ही कुठल्याही राजकारणी व्यक्तीला संमेलनासाठी बोलावले नाही. मात्र आपण बाळासाहेब ठाकरे यांचा वारसा जपला आहे. त्यामुळे आम्ही आपल्याला बोलावलं असल्याचे दीपक केसरकर राज ठाकरेंना उद्देशून म्हणाले.
यावेळी मंचावरुन राज ठाकरे यांनीदेखील आपले विचार मांडले. मराठी या विषयावर मी गेल्या अनेक वर्षापासून काम करतोय. मी कडवट मराठी आहे. माझ्यावर तसे संस्कार झाले आहेत. मराठी विषयावर आंदोलन केली, केसेस घेतल्या, तुरुंगात गेलो. जून महिन्यात अमेरिकेत मला महाराष्ट्र मंडळानी निमंत्रित केले आहे. महाराष्ट्रातील मराठी शाळा बंद होत असताना अमेरिकेत मराठी शाळा उघडतात हे काय कमी आहे का ? असा प्रश्न त्यांनी उपस्थितांना विचारला.
जगभरात मराठी माणूस पसरला याचे कौतुक करत आपण पहिल्यांदा महाराष्ट्रात लक्ष देणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. महाराष्ट्रात मराठी सोडून हिंदी कानावरती पडते त्यावेळी त्रास होतो. भाषेला विरोध नाही मात्र हिंदी ही राष्ट्रभाषा नाही. इतर भाषांसारखी ती एक भाषा आहे. राष्ट्रभाषेचा या देशात निवाडा झाला नाही. राष्ट्रभाषा म्हणून अशी कुठली भाषा निवडली गेली नाही. हे पंधरा-वीस वर्षांपूर्वी मी बोललो त्यावेळी माझ्या अंगावरती अनेक लोक आल्याचेही ते म्हणाले.
राज ठाकरे यांना सांगण्यास मला मनापासून आनंद होतोय की यावर्षीपासूनच आम्ही पहिली ते दहावीपर्यंत मराठी भाषा कंपल्सरी केली आहे, असे मंचावरुन केसरकर म्हणाले. याला उत्तर देण्यासाठी राज ठाकरे पुन्हा माईकजवळ आले आणि शिक्षक ही चांगले नेमा... असा सल्ला राज ठाकरे यांनी दीपक केसरकर यांना दिला.