व्यवस्थेने माझ्या नवऱ्याचा बळी घेतला; साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून शेतकऱ्याच्या पत्नीची टीका

आज केवळ मीच नाही तर संपूर्ण समाज विधवा झाला आहे

Updated: Jan 11, 2019, 06:22 PM IST
व्यवस्थेने माझ्या नवऱ्याचा बळी घेतला; साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून शेतकऱ्याच्या पत्नीची टीका

यवतमाळ: राष्ट्रसंत तुकडोजी महाराज साहित्यनगरीमध्ये शुक्रवारी ९२व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा उद्घाटनसोहळा पार पडला. गेल्या काही दिवसांच्या वादानंतर आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याची पत्नी वैशाली येडे यांना संमेलनाच्या उद्घाटनाचा मान मिळाला होता. यावेळी उद्घाटनाच्या भाषणात वैशाली येडे यांनी व्यवस्थेवर आसूड ओढले. माझ्या नवऱ्याचा बळी हा व्यवस्थेनेच घेतला. पुढच्या जन्मी अदानी, अंबानी होईन असे वाटून पतीने आत्महत्या केली. पण मी हीच वायद्याची शेती, माझ्या हिमतीवर फायद्याची करून दाखवेन. आज केवळ मीच नाही तर संपूर्ण समाज विधवा झाला आहे, असे परखड मत वैशाली येडे यांनी मांडले. 

तत्पूर्वी संमेलनाच्या कार्यक्रमासाठी काही निमंत्रित कवियत्री नयनतारा सहगल यांचे मुखवटे घालून आल्यामुळे गोंधळ निर्माण झाला होता. त्यांनी सभामंडपात सहगल यांचे मुखवटे वाटण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी याठिकाणी धाव घेत या महिलांना सभामंडपाच्या बाहेर नेले. 

या संमेलनाला सुरुवातीला उद्घाटक म्हणून प्रख्यात इंग्रजी साहित्यिका नयनतारा सहगल यांना निमंत्रित करण्यात आले होते. मात्र, स्थानिक राजकारण्यांच्या दबावामुळे आयोजकांनी परस्पर नयनतारा सहगल यांना संमेलनाला न येण्याचा निरोप धाडला होता. यानंतर साहित्यवर्तुळातून महामंडळ आणि आयोजकांवर सडकून टीका झाली होती. तेव्हापासून आयोजक आणि साहित्य महामंडळ नव्या उद्घाटकाच्या शोधात होते. मध्यंतरी आयोजकांनी ज्येष्ठ नाटककार महेश एलकुंचवार, कवी विठ्ठल वाघ आणि सुरेश द्वादशीवर यांच्या नावाचा प्रस्ताव पुढे केला होता. मात्र, इतक्या वादानंतर कोणताही साहित्यिक उद्घाटकाचा मान स्वीकारायला तयार नाही. त्यामुळे आता साहित्य महामंडळ आणि आयोजकांनी आत्महत्याग्रस्त शेतकरी पत्नीच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन करण्याचा नवा मार्ग काढला होता.