घाटकोपरमध्ये मराठी विरुद्ध गुजराती वादः ठाकरेंच्या कार्यकर्त्यांनी बोर्ड काढले, गुजराती भाषिक रस्त्यावर

घाटकोपरमध्ये मराठी-गुजराती वाद पेटणार आहे.  मनसे आणि ठाकरे गटाने बोर्ड काढल्यानंतर आक्रमक झालेले गुजराती बांधव रस्त्यावर उतरले आहेत.   

वनिता कांबळे | Updated: Oct 11, 2023, 07:38 PM IST
घाटकोपरमध्ये मराठी विरुद्ध गुजराती वादः ठाकरेंच्या कार्यकर्त्यांनी बोर्ड काढले, गुजराती भाषिक रस्त्यावर title=

Ghatkopar Gujarati signboard : घाटकोपरमध्ये मराठी-गुजराती वाद पेटणार आहे. राज ठाकरे यांनी महाराष्ट्र नव निर्माण सेना शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी घाटकोपर परिसरात लावण्यात आलेले गुजराती भाषेतील बोर्ड हटवले होते. बोर्ड हटवल्यामुळे गुजराती बांधव आक्रमक झाले असून ते थेट रस्त्यावर उतरले आहेत.  गुजराती भाषेतील बोर्ड हटवल्याचा गुजराती बांधवानी निषेध व्यक्त केला आहे. 

मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी गुजराती भाषेतील बोर्ड फाडले

मुलुंड पाठोपाठ आता घाटकोपरमध्येही मराठी मुद्दा चांगलाच पेटला आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी घाटकोपरमध्ये एका उद्यानात लावण्यात आलेला 'मारो घाटकोपर' हा गुजराती बोर्ड तोडला होता. शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी हल्लाबोल करत हा बोर्ड फोडून टाकला आणि माझं घाटकोपर असं ठसठशीत मराठीत लिहीलेला बोर्ड झळकावला. यानंतर मनसे कार्यकर्त्यांनी घाटकोपरच्या विविध ठिकाणी असलेले गुजराती भाषेतील बोर्ड तोडून टाकले. घाटकोपर पूर्वेकडील आर बी मेहता मार्गावरच्या चौकाला देण्यात आलेल्या गुजराती नावाचा फलक मनसे कार्यकर्त्यांकडून तोडण्यात आला. 

मनसे आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी गुजराती भाषेतील बोर्ड हटवल्याने घाटकोपरमध्ये काहीसं तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या मराठी-गुजराती वादात सुरू असलेल्या तोडफोडीचा भाजपकडून निषेध करण्यात आला होता. हे फलक पुन्हा लावण्यात यावेत अशी मागणी भाजप नेत्यांनी केली होती. 

गुजराती बांधव रस्त्यावर उतरले, पोलिसांत तक्रार दाखल

मनसे आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी घाटकोपरमधील गुजराती भाषेतील बोर्ड हटवल्याने गुजराती बांधव चांगलेच आक्रम झाले असून ते रस्त्यावर उतरले आहेत. गुजराती बांधवांनी तोंडाला काळ्या फिती बांधून आंदोलन करत या तोडफोडीचा निषेध व्यक्त केला. गुजराती बांधवानी पंत नगर पोलिस ठाण्यात या तोडफोडीविरोधात तक्रार दाखल केली आहे. 2016 मध्ये हा बोर्ड येथे लावण्यात आल्याचा दावा गुजराती बांधवांनी केला आहे.

गुजराती आणि मारवाडी यांनाच प्राधान्य; बिल्डरच्या जाहिरातीमुळे वाद

मुंबईच्या मुलुंडमध्ये मराठी महिलेला जागा नाकारण्याचा प्रकार ताजा असतानाच मीरा रोडमध्येही तसाच प्रकार घडल्याचं समोर आले होते. मीरा रोडमध्ये एका नव्या इमारतीच्या मराठी माणसांविरोधातल्या जाहिराती प्रसिद्ध झाल्या होत्या. मिलियन्स एकर या बिल्डरने इमारतीची जाहिरात प्रसिद्ध केली. ज्यात गुजराती आणि मारवाडी यांनाच प्राधान्य दिलं जाईल असं म्हटल होते. मनसेने आक्रमकपणे विरोध केल्यानंतर बिल्डरने राज ठाकरेंची माफी मागत ही जाहिरात मागे घेतली. मात्र, हा प्रोजेक्ट आमदार गीता जैन यांच्याशी संबंधित असल्याची चर्चा आहे. तेव्हा मनसेने गीता जैन यांनाही इशारा दिला होता.