राष्ट्रवादी काँग्रेसमधील सत्तासंघर्ष सध्या निवडणूक आयोगाच्या दारात आहे. शरद पवार विरुद्ध अजित पवार असा संघर्ष सुरु असताना निवडणूक आयोगासमोर वेगवेगळे दावे केले जात आहेत. यादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या विधानाने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. अजित पवार उद्या मुख्यमंत्री झाल्यास पहिला हार मी घालणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. मुंबईत आयोजित महिला कार्यकर्ता पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत उपस्थितांना संबोधित करताना त्यांनी हे विधान केलं.
"आपण देवेंद्रजी यांचे आभार मानायला हवेत. 2024 मध्ये अजित पवारांना पाच वर्षांसाठी मुख्यमंत्री करणार असल्याचं ते म्हणाले आहेत. राष्ट्रवादी महिला काँग्रेस आणि मी स्वत: स्वागत करायला असणार आहे. मी पहिला हार घालेन. का जाणार नाही...पहिला माझा भाऊ आहे. नंतर त्यांचा हक्क आहे. पहिला हक्क माझा असल्याने पहिला हार तर मीच घालणार," असं सुप्रिया सुळेंनी म्हटलं आहे.
सोमवारी निवडणूक आयोगासमोर सुनावणी झाली असता अजित पवार गटाने गंभीर आरोप केले होते. शरद पवार घर चालवावे तसे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कारभार करत होते. फक्त एक व्यक्ती राजकीय पक्ष चालवू शकत नाही. पक्षामध्ये लोकशाही उरली नव्हती, असा थेट आरोप अजित पवार गटाच्या वतीने करण्यात आला.
अजित पवार गटाचा युक्तिवाद सोमवारी पूर्ण झाला आहे. शरद पवार गटाला कागदपत्रं सादर करण्याची चार वेळा संधी देण्यात आली होती. त्यामुळे नवी संधी देऊ नये, ही अजित पवार गटाची विनंती आयोगाने फेटाळली. निवडणूक आयोगाने शरद पवार गटाला 30 ऑक्टोबरपर्यंत सर्व कागदपत्रं सादर करण्याचे आदेश दिले आहेत. पुढील सुनावणी 9 नोव्हेंबर रोजी होणार आहे. त्यावेळी ज्येष्ठ वकील अभिषेक मनु सिंघवी शरद पवार गटाची बाजू मांडतील.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या नऊ आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दाखल केलेल्या याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला. शिवसेनेच्या आमदारांच्या अपात्रतेचे प्रकरणही सर्वोच्च न्यायालयात असून त्याबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रकरणाची 13 ऑक्टोबरला सुनावणी होणार आहे.