दीपाली जगताप, झी मीडिया, मुंबई : एमएचटी-सीईटी निकाल जाहीर झाला असून यंदा मुंबईच्या किमया शिकारखाने आणि अमरावतीच्या सिद्धेश अग्रवाल या दोघांनाही प्रत्येकी ९९.९८ टक्के गुण मिळाले आहेत. घाटकोपरचा प्रियांत जैन याला ९९.९८७ % मिळाले आहेत. तर अहमदनगरच्या अविष्कार आंधळे याला ९९.९९ टक्के मिळाले आहेत. अभियांत्रिकी, औषध निर्माणशास्त्र आणि कृषी पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या एमएचटी-सीईटी परीक्षेचा निकाल आज संकेतस्थळावर पाहता येणार आहे. https://mhtcet2019.mahaonline.gov.in/ या अधिकृत संकेतस्थळावर हा निकाल विद्यार्थ्यांना पाहायला मिळणार आहे.
राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाच्या वतीने राज्यभरातील ३६ जिल्ह्याच्या ठिकाणी १६६ परीक्षा केंद्रांवर ऑनलाईन पद्धतीने १० दिवस १९ सत्रांत ही परीक्षा झाली होती. या परीक्षेसाठी ४ लाख १३ हजार २८४ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ३ लाख ९२ हजार ३५४ विद्यार्थी परीक्षेला बसले.पीएसएम (भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित) हे विषय घेऊन २ लाख ७६ हजार १६६ विद्यार्थी बसले होते, तर पीसीबी (भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र) हे विषय घेऊन २८ हजार १५४ विद्यार्थी परीक्षेला बसले होते.