पुणे : राष्ट्रवादीचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना सक्तवसुली संचालनालयाने (ED) अटक केली. त्यानंतर अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्यावरही ईडीने कारवाई करून त्यांना अटक केली. तर, राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या नागपूर राम गणेश गडकरी साखर कारखान्यावर कारवाई करून ईडीने १३ कोटी ४१ लाख रुपयांची मालमत्ता जप्त केली.
राष्ट्रवादीच्या या नेत्यांपाठोपाठ आता ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ आता लाचलुचपत खात्याच्या रडारवर आले आहेत. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या संबंधित साखर कारखान्याची लाचलुचपत विभाग चौकशी करत आहे.
हसन मुश्रीफ यांचे चिरंजीव नविद मुश्रीफ हे सध्या या साखर कारखान्याचे अध्यक्ष आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यात सर सेनापती संताजीराव घोरपडे सहकारी साखर कारखाना आहे. २०११ मध्ये या साखर कारखान्याची स्थापना झाली. सभासदांना विना कपात पहिली उचल देणारा साखर कारखाना अशी या कारखान्याची ओळख आहे.
भाजप नेते किरीट सोमय्या यांनी काही महिन्यांपूर्वी लाचलुचपत विभागाकडे मुश्रीफ यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. त्यानुसार आता कोल्हापूर लाचलुचपत पथक या कारखान्याची चौकशी करत आहे.