नळावरच्या भांडणाचा निकाल लागला... २३ वर्षांनी!

वयाचा विचार करून तसेच चांगल्या वर्तणुकीच्या हमीवर सुटका 

Updated: Aug 10, 2018, 04:21 PM IST
नळावरच्या भांडणाचा निकाल लागला... २३ वर्षांनी!

अरूण मेहेत्रे, झी मीडिया, पुणे : न्यायालयीन खटला म्हणजे केवळ तारखांवर तारखा... एखाद्या गंभीर गुन्हाच्या बाबतीत ते ठिकही असेल, पण बायकांमध्ये झालेल्या नळावरील भांडणाचा निकाल लागायला तब्बल २३ वर्षे लागत असतील तर त्याला काय म्हणायचं? सांस्कृतिक नगरी पुण्यात हे घडलंय. 

२८ ऑक्टोबर १९९५ ची ही घटना... पार्वतीबाई गायकवाड, कविता घोलप आणि मंगल कांबळे या तिघी एकमेकींच्या शेजारणी... चंदन नगर परिसरात राहणाऱ्या... पार्वतीबाई आणि कविता यांचा मंगलशी वाद होता. नळावर पाणी भरण्याच्या निमित्तानं तिघी एकत्र आल्या... आणि तिथंच जुन्या वादाचं रुपांतर एकमेकींशी झटापटीत झालं. त्यात कवितानं मंगलच्या हाताचा चावा घेतला आणि प्रकरण न्यायालयापर्यंत गेलं. न्यायालयात पार्वतीबाई विरूद्ध खटला चालला. या खटल्याची सुनावणी २३ वर्षे चालली... आणि आता अखेर त्याचा निकाल लागला आहे. न्यायालयानं  या खटल्यातील आरोपी पार्वतीबाई हिची तिच्या वयाचा विचार करून तसेच चांगल्या वर्तणुकीच्या हमीवर सुटका केलीय. 
   
खटल्यातील पार्वतीबाईचं वय आज ५९ वर्षे आहे. विशेष म्हणजे २३ वर्षे चाललेल्या या खटल्यातील दुसरी आरोपी कविता घोलप ही अजूनही फरार आहे. त्यामुळे खटल्याच्या कामकाजाबरोबरच पोलीस तपासही काय गतीनं झालाय याची कल्पना येते. असो, क्षणाचं भांडण कसं दोन दशकांहून अधिक काळ चालंलं याचं हे उदाहरण आहे... आणि आता न्यायालयात मिटलं असंलं तरी प्रत्यक्षातही ते मिटणं आवश्यक आहे.