डोंबिवली : ठाण्यानंतर आता डोंबिवलीतही एका अल्पवयीन मुलीचा रिक्षावाल्याने विनयभंग करण्याची घटना घडलीय.
कल्याण - शिळ रोडवरच्या टाटा पॉवर नाक्याजवळ अल्पवयीन विद्यार्थिनीचं अपहरण करून विनयभंग केल्याची धक्कादायक घटना समोर आलीय. या प्रकरणी मानपाडा पोलिसांनी धिरेंद्र मेहता याच्यासह रिक्षा चालक मनुसिंग राजेंद्रसिंग विरोधात गुन्हा दाखल केलाय. आरोपींना अटकही करण्यात आलीय.
क्लासमधून परतत असताना या अल्पवयीन मुलीचं तोंड दाबत धिरेंद्रनं तिला बळजबरीनं रिक्षात बसवलं. रिक्षात त्यानं तिचा विनयभंग केला आणि याच दरम्यान मुलीचा भाऊ या परिसरात पोहचला. त्यानं हा प्रकार पाहताच रिक्षा चालकानं रिक्षा पुढे दामटण्याचा प्रयत्न केला.
दरम्यानच्या काळात मुलीनं धावत्या रिक्षातून उडी मारली. दरम्यान, या प्रकरणी पीडित मुलीने रविवारी सायंकाळी उशिराने मानपाडा पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली. कल्याण कोर्टानं दोघांनाही पोलीस कोठडी दिलीय.