सचिन कसबे, झी मीडिया, पंढरपूर : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमावादाचा (Karnataka Borderism) वाद चांगलाच पेटला आहे. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रातील काही गावांवर दावा ठोकला असून सीमेवरील काही गावांनीही कर्नाटकमध्ये जाण्यासाठी आंदोलन चालू केलं आहे. मुख्यमंत्री बसवराज बोमईंनी (CM Basavaraj Bommai) महाराष्ट्रातील मंत्र्यांनी बेळगावात येऊ नये असं म्हटलं होतं. याच पार्श्वभूमीवर शिंदे सरकारमधील आमदार शहाजीबापू पाटील (MLA Shahaji Bapu Patil) यांनी थेट मुख्यमंत्र्यांना इशारा दिला आहे.
पक्षाने आदेश दिल्यास बेळगावात गमिनी काव्याने घुसून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करू असा सूचक इशारा कर्नाटक सरकारला दिला आहे. मी कुठनं तरी घुसून महाराजांना हार घालून येईन.. कळूही द्यायचो नाही,
असं शहाजीबापू पाटील म्हणाले. सांगोल्यात आज दिव्यांग दिनाच्या निमित्ताने संवाद मेळाव्याचे आयोजन केलं होतं. यावेळी आमदार शहाजी बापू पाटील यांनी कर्नाटक आणि महाराष्ट्र सीमा वादावर बोलताना आव्हान दिले आहे.
बोमईंच्या आव्हानानंतर उच्च तंत्रज्ञान शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील आणि उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी आपण बेळगावात जावून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करणार असल्याचं जाहीर केले आहे. समन्वय समितीमार्फत महाराष्ट्रातील दोन मंत्री कर्नाटकमध्ये जाणार होते. मात्र त्यावेळी बोमई यांनी कायदा आणि सुव्यवस्थेचं कारण सांगत त्यांना येण्यास नकार दिला.
दरम्यान, बोमई यांनी संबंधित दोन मंत्र्यांना येण्यास नकार दिल्याने राज्यातील वातावरण तापलं आहे. यावरून अनेक राजकीय प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत.