झाकीर हुसैन यांची अनोखी प्रेमकहाणी: परदेशी मुलीशी लग्न सोपं नव्हतं, आईच्या विरोधानंतरही...

पद्मश्री, पद्मभूषण आणि पद्मविभूषण पुरस्कारांनी सन्मानित महान तबलावादक झाकीर हुसेन यांचे 73व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या निधनाने संपूर्ण संगीत विश्वाला मोठा धक्का बसला आहे. झाकीर हुसैन यांनी जगभरात स्वतःची ओळख निर्माण करत संगीतप्रेमींवर अमिट छाप सोडली. त्यांच्या पश्चात पत्नी अँटोनिया आणि दोन मुली असा परिवार आहे. आज त्यांच्या जीवनातील अप्रतिम प्रेमकथेबद्दल जाणून घेऊ.  

- | Updated: Dec 16, 2024, 04:04 PM IST
झाकीर हुसैन यांची अनोखी प्रेमकहाणी: परदेशी मुलीशी लग्न सोपं नव्हतं, आईच्या विरोधानंतरही... title=

झाकीर हुसैन यांचे करिअर संघर्षाने भरलेले होते. वडिलांच्या छायेतून बाहेर पडून, त्यांनी स्वतःची ओळख निर्माण केली. परदेशी सहलींमध्ये आर्थिक अडचणींचा सामना करत त्यांनी तबल्याला जागतिक स्तरावर प्रसिद्ध केले. कष्ट आणि समर्पणाने त्यांनी तीन ग्रॅमी पुरस्कारांसह अनेक मानचिन्हे मिळवली.

प्रेमाचा प्रवास:
ज्येष्ठ तबलावादक उस्ताद अल्ला रखा यांचे पुत्र झाकीर हुसेन हे तबल्याचे शिक्षण घेण्यासाठी कॅलिफोर्नियाला गेले होते. तिथेच 70च्या दशकात एका इटालियन-अमेरिकन मुलीवर म्हणजेचं अँटोनिया मिनेकोलावर त्यांचे हृदय जडले. अँटोनिया कथ्थक शिकत होती, तर झाकीर तबल्यावर आपले प्रभुत्व सिद्ध करत होते. पहिल्या नजरेतच झाकीर तिच्या प्रेमात पडले.  

तासनतास वाट पाहिली: 
अँटोनियाला सुरुवातीला झाकीर यांच्या प्रेमाचा स्वीकार करायला संकोच वाटत होता. मात्र, झाकीर तितकेचं जिद्दी होते. ती होकार देईपर्यंत त्यांनी तिच्या डान्स क्लासच्या बाहेर तासनतास थांबून तिची वाट पाहिली. अखेर अँटोनियाने संधी दिली, त्यांचं नातं वाढलं आणि प्रेमविवाहापर्यंत पोहोचलं.  

अडथळ्यांचा सामना:  
त्यांच्या लग्नात अडथळे कमी नव्हते. अँटोनियाच्या वडिलांना वाटत होतं की झाकीर यांच्याकडे उत्पन्नाचं स्थिर साधन नाही. मात्र, त्यांच्या मेहनतीने वडील तयार झाले. यानंतर अडचण झाकीर यांच्या कुटुंबात आली. झाकीर यांच्या वडिलांना लग्नाबद्दल आनंद होता, पण त्यांच्या आईने या आंतरजातीय लग्नाला विरोध केला.  

आईचा विरोध:  
एका मुलाखतीत झाकीर हुसैन यांनी सांगितलं होतं की, ते त्यांच्या कुटुंबातील दुसऱ्या कास्टमध्ये लग्न करणारे पहिले होते. त्यामुळे त्यांच्या आईने सुरुवातीला हा निर्णय मान्य केला नाही. मात्र, झाकीरयांच्या वडिलांनी गुपचूप लग्न लावून दिलं. काही वर्षांनंतर झाकीर यांच्या आईने अँटोनियाला सून म्हणून स्वीकारलं.  

एक अनोखं प्रेमसंबंध:  
झाकीर आणि अँटोनिया यांना दोन मुली आहेत. त्यांनी संघर्षमय प्रवासातून त्यांच्या प्रेमाला यश मिळवलं. झाकीर हुसेन यांच्या संगीतप्रेमाइतकाचं त्यांचा वैयक्तिक जीवनाचा प्रवासही प्रेरणादायी आहे.