World News : इस्लामिक राष्ट्रांमध्ये अनेकदा काही असे नियम लागू असतात ज्याचा विचार अनेकांनीच केलेला नसतो. या राष्ट्रांमध्ये कोणतं कृत्य शिक्षेस कधी पात्र ठरेल हेसुद्धा सांगता येत नाही. अशाच एका नियमामुळं सध्या संपूर्ण जगभरात खळबळ माजली आहे जिथं एका महिला गायिकेला तिच्या कलेच्या सादरीकरणामुळं शिक्षा भोगावी लागली आहे.
'टाइम्स ऑफ इजराइल'च्या अहवालानुसार 27 वर्षीय इराणी गायिकेला एका कॉन्सर्टदरम्यान हिजाब न घातल्यामुळे अटक करण्यात आली आहे. गायिकेचे वकील मिनाद पनाही यांच्या माहितीनुसार परस्तू अहमदी असं या गायिकेचं नाव असून तिला इराणची राजधानी असणाऱ्या तेहरान इथून साधारण 280 किमी अंतरावर असणाऱ्या माजंदरान प्रांतील सारी शहरात अटक करण्यात आली.
गुरुवारी एका कॉन्सर्टचा व्हिडीओ ऑनलाईन पोस्ट केल्यानंतर तिच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली. जिथं या गायिकेनं चार पुरूष संगीतकारांसह हिजाबाशिवाय मोकळ्या केसांमध्ये परफॉर्म करताना पाहिलं गेलं.
अहमदीनं युट्यूबवर पोस्ट केलेल्या व्हिडीओमध्ये लिहिलं, 'मी एक परस्तू आहे... एक अशी मुलगी जी अशा व्यक्तींसाठी गाऊ इच्छिते ज्यांच्यावर माझं प्रेम आहे. हा एक असा अधिकार आहे ज्याकडे मी दुर्लक्ष करू शकत नाही. मी त्या भूमिसाठी गाते ज्या भूमिवर माझं नितांत प्रेम आहे. या व्हर्चुअल संगीत कार्यक्रमाच्या माध्यमातून माझा आवाज ऐका आणि या सुंदर मातृभूमीची कल्पना करा...'
परस्तू अहमदीच्या या कॉन्सर्टच्या व्हिडीओला 1.5 मिलियन व्ह्यू मिळाले असून, फक्त या महिला गायिकेवरच नव्हे तर तिच्यासोबत दिसलेल्या सोहेल फागीह नासिरी आणि एहसान बेराघदार यांनाही पोलिसांनी त्याच दिवशी ताब्यात घेतलं.
1979 च्या इस्लामी क्रांतीनंतर इराणी कायद्यानुसार या देशात हिजाब सक्ती लागू करण्यात आली. इथं कैक महिला हिजाब धार्मिक आस्था आणि अभिव्यक्तीस्वातंत्र्याच्या रुपात परिधान करतात.