नवी दिल्ली : दिल्लीत प्रकाशित झालेल्या आज के शिवाजी पुस्तकावरून आता महाराष्ट्रतल्या नेत्यांमध्येच घमासान सुरू झालंय. शिवसेना खासदार संजय राऊतांना राजीनामा मागण्याचा अधिकार नसल्याचा पलटवार भाजप आमदार शिवेंद्रराजे भोसलेंनी केलाय. संजय राऊतांनी जपून भाषा वापरावी असा इशाराही शिवेंद्रराजेंनी दिलाय. पुस्तकाच्या निषेधार्थ सर्व राजेंनी आपल्या पदांचा राजीनामा द्यायला हवा अशी मागणी संजय राऊतांनी केलीय.
शिवरायांशी पंतप्रधान मोदींची तुलना केलेल्या पुस्तकावरून खासदार संजय राऊत यांनी भाजपवर जोरदार टीका केलीय. राज्यातील भाजप नेत्यांनी आपली भूमिका स्पष्ट करण्याची मागणी राऊतांनी केली. संभाजीराजे खासदारकीचा आणि शिवेंद्रराजेंनी आमदारकीचा राजीनामा द्यावा अशी मागणी शिवसेना खासदार संजय राऊतांनी केलीय. तसंच त्यांनी आपल्यावर चीडचीड करण्यापेक्षा भूमिका स्पष्ट करावी असं आव्हानही त्यांनी दिलंय.
शिवरायांची मोदींशी तुलना केलेली पटते का, असा सवाल छत्रपतींच्या वंशजांना विचारणारे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी छत्रपती संभाजीराजे यांचा रोष ओढवून घेतला आहे. छत्रपती संभाजीराजे यांनी अगदी एकेरी उल्लेख करत संजय राऊत यांना करड्या शब्दात समज दिली होती.
उद्धवजी त्या संजय रौताच्या जिभेला लगाम घाला. प्रत्येकवेळी छत्रपती घराण्यावर गरळ ओकून राजकारण करतोय. त्याने आधी माहिती घ्यायला पाहिजे होती, की मी जिजाऊ जयंतीनिमित्तच्या कार्यक्रमावेळी सिंदखेडराजामध्ये काय बोललो आहे ते. त्याची मुजोरी सहन केली जाणार नाही, असे संभाजीराजे यांनी म्हटले होते.