मराठी बोलण्यावरुन तरुणाला मारहाण करणाऱ्या परप्रांतीय फेरीवाल्यांना मनसे कार्यकर्त्यांकडून चोप

कल्याणमध्ये मनसेच्या कार्यकर्त्यांना फेरीवाल्यांना मारहाण केली आहे. मनसे कार्यकर्त्यांनी स्कायवॉकवर जाऊन परप्रांतीय फेरीवाल्यांना चोप दिला.   

शिवराज यादव | Updated: Oct 2, 2023, 04:49 PM IST
मराठी बोलण्यावरुन तरुणाला मारहाण करणाऱ्या परप्रांतीय फेरीवाल्यांना मनसे कार्यकर्त्यांकडून चोप title=

मराठी महिलेला मुंबईत घर नाकारल्याचं प्रकरण ताजं असतानाच पुन्हा एकदा मराठी माणसालाच दुय्यम वागणूक मिळाल्याचं समोर आलं आहे. कल्याणमध्ये मराठी तरुणाला परप्रांतीय फेरीवाल्यांनी मारहाण केली आहे. दरम्यान, मनसेने या मारहाणीची दखल घेत फेरीवाल्यांना धडा शिकवला आहे. यानिमित्ताने मनसेने पुन्हा एकदा परप्रांतीय फेरीवाल्यांविरोधातील खळखट्याक आंदोलन सुरु केल्याची चर्चा सुरु आहे. 

कल्याणमध्ये मनसेच्या कार्यकर्त्यांना फेरीवाल्यांना मारहाण केली आहे. मराठी बोलण्यावरुन तरुणाचा परप्रांतीय फेरीवाल्यांशी वाद झाला. यावेळी फेरीवाल्यांना मराठी तरुणाला मारहाण केली अशी माहिती मिळत आहे. यानंतर तरुणाने मनसे कार्यकर्त्यांशी संवाद साधत संपूर्ण घटनाक्रम सांगितला. यानंतर मनसे कार्यकर्त्यांनी स्कायवॉकवर जाऊन परप्रांतीय फेरीवाल्यांना चोप दिला. 

मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री हा प्रकार घडला. एका मराठी तरुणाने कल्याणमधील स्कायवॉकवर परप्रांतीय फेरीवाल्याकडून वस्तू खरेदी केली होती. ही वस्तू खराब असल्याने त्याने ती परत करत पैसे देण्यास सांगितलं. यावरुन मराठी तरुण आणि परप्रांतीय फेरीवाल्यात वाद झाला. यावेळी परप्रांतीय फेरीवाल्याने मराठी माणसांबद्दल अपशब्द वापरत तरुणाला मारहाण केली. 

हा तरुण विद्यार्थी होता. मारहाण झाल्यानंतर हा तरुण कल्याण पूर्व येथील मनसेच्या शाखेत गेला आणि घडलेला सगळा प्रकार सांगितला. यानंतर मनसेचे कार्यकर्ते स्कायवॉकवर दाखल झाले आणि परप्रांतीय फेरीवाल्याला बेदम मारहाण केली. मनसेच्या कार्यकर्त्यांनी या फेरीवाल्याला रेल्वे पोलिसांकडे सोपवलं. पोलिसांनी त्याला अटक केल्याची माहिती मिळत आहे. 

समृद्धी टोल नाक्यावर परप्रांतीय अधिकाऱ्याल मारहाण

समृद्धी महामार्गावरील टोल नाक्यावर काम करणारे मराठी कर्मचारी तरुणांना परप्रांतीय अधिकारी त्रास देत असल्याचा आरोप करीत मनसे महिला आघाडीच्या महिलांनी टोल नाक्यावरील परप्रांतीय अधिकाऱ्याला मारहाण केल्याची घटना छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यात समृद्धी महामार्गावर घडली. मराठी माणसाला त्रास झाल्यास यापेक्षा अधिक तीव्र आंदोलन करण्याचा इशारा मनसेकडून देण्यात आला आहे.

मुलुंडमध्ये मराठी महिलेला घर नाकारलं

मुंबईतील मुलुंडमध्ये महिलेला 'महाराष्ट्रीयन नॉट आलाऊड' म्हणत घर नाकाराल्याचं प्रकरण अद्यापही ताडं आहे महिलेने सोशल मीडियावर या घटनेची वाच्यता केल्यानंतर एकच खळबळ माजली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. सोसायटीच्या सचिवांनी अरेरावीची भाषा केली आणि हुज्जत घातली असा आरोप महिलेने केला होता. त्यासोबत महिलेच्या नवऱ्याला मारहाण केल्याचंही महिलेने व्हिडीओमध्ये सांगितलं होतं. 

ही घटना व्हायरल झाल्यानंतर मनसे, काँग्रेस, शिवसेना, भाजपा यासह सर्वांनीच दखल घेतली. महाराष्ट्र महिला आयोगानेही या घटनेची दखल घेतली. महाराष्ट्राच्या राजधानीत मुंबईत मराठी भाषिक महिलेला सदनिका नाकारली जाते, ही बाब अतिशय गंभीर आहे. त्यामुळे ह्या घटनेची दखल महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने घेतली असून याप्रकरणी सहकार आयुक्त, महाराष्ट्र राज्य, पुणे तसेच प्रधान सचिव, गृहनिर्माण विभाग, महाराष्ट्र राज्य, मंत्रालय, मुंबई यांना चौकशी करून अहवाल मागविण्यात आला आहे.

त्याचप्रमाणे याप्रकरणी संबंधित महिलेला भाषेच्या आधारे दुय्यम  वागणूक देऊन  मारहाण करण्यात आल्याबाबत चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याचे निर्देश संबंधित पोलीस ठाणे यांना देण्यात आले आहेत, असं ट्वीट महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकरणकर यांनी केलं आहे. 

Tags: