'बिनशर्ट पाठिंबा' म्हणत वडिलांची खिल्ली उडवणाऱ्या उद्धव ठाकरेंना अमित ठाकरेंचं उत्तर, म्हणाले 'तुमच्या मुलाला...'

Amit Thackeray on Uddhav Thackeray: लोकसभा निवडणुकीतील निकालानंतर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा देणाऱ्या मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची (Raj Thackeray) खिल्ली उडवली आहे. वर्धापन दिनाच्या सोहळ्यात त्यांनी 'बिनशर्ट पाठिंबा' असं म्हणत टोला लगावला.   

शिवराज यादव | Updated: Jun 21, 2024, 01:12 PM IST
'बिनशर्ट पाठिंबा' म्हणत वडिलांची खिल्ली उडवणाऱ्या उद्धव ठाकरेंना अमित ठाकरेंचं उत्तर, म्हणाले 'तुमच्या मुलाला...' title=

Amit Thackeray on Uddhav Thackeray: लोकसभा निवडणुकीत महायुतीला अपेक्षित यश न मिळाल्याने उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा देणाऱ्या मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची (Raj Thackeray) खिल्ली उडवली होती. वर्धापन दिनाच्या सोहळ्यात त्यांनी 'बिनशर्ट पाठिंबा' असं म्हणत टोला लगावला. राज ठाकरेंनी नरेंद्र मोदींना पंतप्रधान कऱण्यासाठी नरेंद्र मोदींना आपला पाठिंबा जाहीर केला होता. दरम्यान उद्धव ठाकरेंनी केलेल्या टीकेला राज ठाकरेंचे पुत्र अमित ठाकरे (Amit Thackeray) यांनी उत्तर दिलं आहे. 

राज ठाकरे नेमकं काय म्हणाले होते?

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी 9 एप्रिलला शिवाजी पार्कमध्ये गुढीपाडव्याच्या निमित्ताने आयोजित मेळाव्याला संबोधित केलं होतं. यावेळी ते म्हणाले होते की, "महाराष्ट्र नवनिर्माण सेना भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादी...परंतु फक्त नरेंद्र मोदींसाठी बिनशर्त पाठिंबा देत आहे असं मी जाहीर करतो".

उद्धव ठाकरेंनी केली होती टीका

शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंच्या बिनशर्त पाठिंब्याची खिल्ली उडवली होती. ते म्हणाले होते की, "या लोकसभा निवडणुकीत आपले कोण, परके कोण, मित्र कोण आणि शत्रू कोण हे समोर आलं आहे. काही जणांनी केवळ उद्धव ठाकरे नको म्हणून ‘बिनशर्ट’ पाठिंबा दिला. उघड पाठिंबा दिला म्हणजे बिनशर्ट ना. काय तर उद्धव ठाकरे नको, मी हा बघा शर्ट काढला, बिनशर्ट पाठिंबा देतो". 

अमित ठाकरेंचं उत्तर

उद्धव ठाकरेंनी केलेल्या टीकेनंतर मनसे नेते त्यांना प्रत्युत्तर देत आहेत. यादरम्यान अमित ठाकरे यांनीही त्यांना उत्तर दिलं आहे. “उद्धव ठाकरेंचा विनोद मला कळायलाही दहा मिनिटं लागली. वरळीत त्यांना जेव्हा बिनशर्त पाठिंबा दिला तेव्हा त्यांना काही वाटलं नाही. तेव्हा त्यांनी तो घेतला आणि मुलाला आमदार केलं. या गोष्टी विसरायला नकोत. राज ठाकरेंनी जो पक्ष काढला आहे तो स्वतःच्या मेहनतीवर काढला आहे. पक्ष मोठा व्हायला वेळ लागला असेल तरीही तो आपल्या मेहनीतवर काढलेला पक्ष आहे हे कुणी विसरु नये. विधानसभा निवडणुकीत आम्ही आमची शक्ती दाखवू.” असं ते म्हणाले आहेत. 

राज ठाकरेंनी घेतलेल्या सभा

लोकसभा निवडणुकीमध्ये राज ठाकरेंनी नारायण राणेंबरोबरच पुण्यातील मुरलीधर मोहोळ यांच्यासाठी प्रचारसभा घेतली होती. तसेच त्यांनी मुख्यमंत्री शिंदेंचे पुत्र श्रीकांत शिंदेंच्या मतदारसंघातही महायुतीसाठी प्रचारसभा घेतलेली. राज यांनी जिथे सभा घेतल्या तिथे महायुतीचा विजय झाल्याचं सांगत मनसेनं समर्थनावरुन महाविकास आघाडीला यापूर्वीच सुनावलं आहे.