MNS Chief Raj Thackeray Angry: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी आज पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची मुंबईत बैठक घेतली. पदवीधर निवडणूक आढावा बैठकीमध्ये राज ठाकरे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांवर चांगलेच संतापल्याचं पाहायला मिळालं. वारंवार बैठकी होऊ सुद्धा पदवीधर मतदारांची नोंदणी का होत नाही? असा सवाल राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना विचारला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पदवीधर निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवतीर्थ या राज ठाकरेंच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीमध्ये ते दिलेलं टार्गेट पूर्ण न झाल्याने पदाधिकाऱ्यांवर संतापल्याचं समजतं.
मनसेच्या मुंबईतील पदाधिकाऱ्यांची बैठक आज शिवतीर्थवर पार पडली. या बैठकीला वॉर्ड अधिकाऱ्यांपासून ते पदाधिकाऱ्यांपर्यंत सर्वचजण उपस्थित होते. लोकसभा मतदारसंघानुसार या बैठकींचं आयोजन केलं जात आहे. या बैठकीमध्ये प्रामुख्याने पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी पदावीधर मतदारांच्या नोंदणीचा विषय चर्चेत आला. जास्तीत जास्त पदवीधर मतदारांची नोंदणी करुन घ्यावी. त्यासंदर्भातील टार्गेट पदाधिकाऱ्यांना आधीच्या बैठकींमध्ये देण्यात आलं होतं. मात्र जेवढं टार्गेट निश्चित करुन देण्यात आलेलं ते पूर्ण झालं नाही. त्यामुळे राज ठाकरे पदाधिकाऱ्यांवर संतापले.
किमान एका वॉर्डामधून 500 पेक्षा जास्त मतदारांची नोंदणी झाली पाहिजे अशापद्धतीचं टार्गेट देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. हेच टार्गेट डोळ्यासमोर ठेऊन कामाला लागण्याचे आदेश मनसे अध्यक्षांनी दिले आहेत. हे ठरवून दिलेलं टार्गेट का पूर्ण होत नाही? हे पूर्ण करण्यात काय अडचणी येत आहेत? याचा आढावा राज ठाकरे घेत आहेत. मात्र ज्या प्रकारे कार्यकर्त्यांचा थंड प्रतिसाद मिळतोय तो पाहून राज ठाकरेंनी संताप व्यक्त केला आहे.
राज ठाकरेंबरोबरच या बैठकीला बाळा नांदगावकर, संदीप देशपांडे आणि इतरही प्रमुख नेते तसेच पदाधिकारी उपस्थित होते. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून मागील बऱ्याच काळापासून पदावीधर मतदारसंघाच्या निवडणुकींची जोरदार तयारी सुरु असल्याचं दिसत आहे. पारंपारिक मतदारांबरोबर नव्याने मतदार नोंदणी करुन या निवडणुकीमध्ये संपूर्ण ताकदीने उतरण्याचा मनसेचा मानस आहे. स्वत: राज ठाकरेंनी जातीनं या निवडणुकींमध्ये लक्ष घातलं आहे. तेच अनेकदा यासंदर्भातील आढावा बैठकी घेताना दिसत आहेत. नेत्यांना काही ठराविक टार्गेट देण्यात आलेली आहेत. या टार्गेचा आढावा घेण्यासाठी नियोजित वेळेनुसार बैठकींचं आयोजन केलं जातं. अशीच एक बैठक आज सकाळी पार पडली असता कामाचा वेग आणि नोंदणी झालेल्या मतदारांची संख्या पाहून राज चांगलेच खवळल्याचं पाहायला मिळालं. राज यांनी सर्व पदाधिकाऱ्यांना जोमाने कामाला लागण्याचे निर्देश दिलेत.