'राज ठाकरे जनतेच्या मनातील मुख्यमंत्री'; नवी मुंबईतील Birthday होर्डिंगची जोरदार चर्चा

Raj Thackeray Birthday Hording: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपण वाढदिवसाच्या दिवशी सकाळी ८:३० ते दुपारी १२:०० वाजेपर्यंत कार्यकर्त्यांच्या शुभेच्छा स्वीकारण्यासाठी उपस्थित असेल असं यापूर्वीच जाहीर केलं आहे.

स्वप्निल घंगाळे | Updated: Jun 13, 2023, 03:17 PM IST
'राज ठाकरे जनतेच्या मनातील मुख्यमंत्री'; नवी मुंबईतील Birthday होर्डिंगची जोरदार चर्चा title=
नवी मुंबईमध्ये झळकले होर्डिंग

Raj Thackeray Birthday Hording: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांचा बुधवारी म्हणजेच 14 जून रोजी वाढदिवस आहे. राज ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त (Raj Thackeray Birthday) मनसे कार्यकर्त्यांनी तयारी सुरु केली असतानाच नवी मुंबईमध्ये काही होर्डिंगने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. नवी मुंबईमधील मनसेचे नेते गजानन काळेंनी राज ठाकरेंचा उल्लेख 'जतनेच्या मनातील मुख्यमंत्री' असा केलेले हॉर्डिंग लावले आहेत. या होर्डिंगची सध्या मुंबईमध्ये चर्चा असल्याचं दिसून येत आहे.

काय आहे होर्डिंगवर?

मनसेचे प्रवक्ते तसेच नवी मुंबई मनसेचे अध्यक्ष असलेल्या गजानन काळे यांनी हे होर्डिंग वाशी टोल नाक्यावर लावले आहेत. या होर्डिंगवर भगवा रंग प्राकर्षाने वापरण्यात आला आहे. कपाळावर भगवा टिळा, गळ्यात मफलर घातलेल्या लूकमधील राज ठाकरेंचा फोटो या बॅनरवर दिसत आहे. तसेच राज यांचे पुत्र आणि महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरेंचाही फोटो या होर्डिंगवर दिसत आहे. या होर्डिंगवर मुख्यमंत्री हा शब्द अगदी मोठ्या आकारच्या फॉण्टमध्ये लिहिलेला आहे. 

कॅप्शनही चर्चेत

या होर्डिंगचे फोटो गजानन काळे यांनीच ट्वीटरवरुन शेअर केले आहेत. "वाढदिवस जनतेच्या मनातील मुख्यमंत्र्यांचा... वाढदिवस आदरणीय राजसाहेब ठाकरे यांचा... तयारी…" अशी कॅप्शन या फोटोंना गजानन काळेंनी दिली आहे. तसेच त्यांनी हार्टचा इमोजही या कॅप्शनमध्ये वापरला आहे.

राज यांचं आवाहन

दरम्यान, राज ठाकरेंनी सोमवारी सोशल मीडियावरुन त्यांच्या वाढदिवसानिमित्त एक आवाहन केलं आहे. "दर वर्षी १४ जूनला माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून महाराष्ट्र सैनिक मोठ्या संख्येने मला भेटायला, शुभेच्छा द्यायला येतात. त्यावेळी तुमची होणारी भेट, तुमच्याकडून मिळणाऱ्या शुभेच्छा हीच माझ्यासाठी तुमच्याकडून मिळणारी मोठी भेट असते. पण तरीही महाराष्ट्र सैनिक येताना पुष्पगुच्छ, मिठाई आणि भेटवस्तू घेऊन येतात. पण या वर्षीपासून माझी तुम्हाला मनापासून विनंती आहे की कृपया पुष्पगुच्छ, मिठाई अथवा कोणतीही भेटवस्तू आणू नका. तुम्हाला अगदीच काही आणावंसं वाटत असेल तर येताना झाडाचं रोप किंवा शैक्षणिक साहित्य मग त्या वह्या असतील किंवा तसंच एखादं छोटंसं शैक्षणिक साहित्य आणा. तुम्ही दिलेली झाडांची रोपं आपण विविध संस्थांना वृक्षारोपणासाठी देऊ. आणि जे काही शैक्षणिक साहित्य भेटवस्तू म्हणून आणाल ते गरजू विद्यार्थ्यांना आपल्या पक्षाकडून भेट म्हणून देऊ. तुम्ही माझ्या ह्या विनंतीचा नक्की मान ठेवाल ह्याची मला खात्री आहे," असं राज यांनी सोशल मीडियावरील पोस्टमध्ये म्हटलं आहे.

राज यांच्या वाढदिवसानिमित्त मनसेकडून मोठ्या प्रमाणात तयारी करण्यात येत आहे. अगदी समाजउपयोगी कामांपासून ते सोशल मीडियावरही राज ठाकरेंचा वाढदिवस दणक्यात साजरा करण्याचा मनसेचं नियोजन आहे.