Raj Thackeray On Shinde Government: बदलापूरमधील अत्याचार प्रकरणावरुन राज्यातील राजकारण चांगलेच तापलेले असताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनाच धारेवर धरलं आहे. राज ठाकरेंनी लाडकी बहीण योजनेचा उल्लेख करत राज्यातील महिला खरचं तुमच्या लाडकी बहीण असतील तर आधी त्यांच्यामध्ये सुरक्षेची भावना निर्माण करा असं राज ठाकरेंनी सुचवलं आहे. एवढ्यावरच न थांबता त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यातच असा प्रकार घडत असेल तर इतर ठिकाणच्या परिस्थितीची कल्पनाही करायला नको असंही म्हटलं आहे.
"बदलापूरमध्ये जी अत्यंत दुर्दैवी आणि भीषण घटना घडली, त्यावर मी काल पण म्हणलं तसं, यावर कारवाई व्हायला इतका वेळ का लागला? या विषयाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माझ्या महिला पदाधिकाऱ्यांनी वाचा फोडली, विषय लावून धरला, आणि त्यातून जनआक्रोशाला तोंड फुटलं," असं राज ठाकरेंनी म्हटलं आहे.
ठाणे जिल्ह्यातील बदलापूरमध्ये हे घडल्याच्या मुद्द्याकडे लक्ष वेधत राज ठाकरेंनी, "मुळात हा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा जिल्हा. या जिल्ह्यातच जर कायदा धाब्यावर बसवला जात असेल तर बाकी ठिकाणची परिस्थिती काय असेल याची कल्पना पण करवत नाही," असंही म्हटलं आहे.
नक्की वाचा >> Badlapur School Case: 'काठीवाल्या दादा'नेच केला घात; आरोपी अक्षय शिंदे आहे तरी कोण?
शिंदे सरकारच्या महत्त्वाकांशी लाडकी बहीण योजनेचा उल्लेख करत राज ठाकरेंनी टोला लगावला आहे. "आज सरकार 'लाडकी बहीण' योजनेच्याद्वारे स्वतःच कौतुक करून घेण्यात मग्न आहे, पण जर तुमची बहीण खरंच लाडकी असेल तर तिच्यावर अशी वेळ येऊ नये आणि दुर्दैवाने आलीच तर तिला न्याय मिळेल हे पाहणं, हे पहिलं कर्तव्य नाही का?" असा सवाल राज ठाकरेंनी उपस्थित केला आहे. "जनतेच्या पैशातून, बहिणींना पैसे देऊन, स्वतःचं ब्रॅण्डिंग करण्यापेक्षा ती सुरक्षित आहे,ही भावना जरी निर्माण केलीत तरी खूप आहे," असा खोचक टोलाही राज यांनी लगावला आहे.
"माझ्या पक्षाच्या महिला पदाधिकाऱ्यांमुळे हा विषय आज समोर आलाय याचा मला अभिमान आहे. पण मुळात असे प्रकार घडू नयेत यासाठी कडक कायदे आणि त्याची अंमलबजावणी होणं गरजेचं आहे," असं राज ठाकरेंनी पोस्टच्या शेवटी म्हटलं आहे.
बदलापूरमध्ये जी अत्यंत दुर्दैवी आणि भीषण घटना घडली, त्यावर मी काल पण म्हणलं तसं, यावर कारवाई व्हायला इतका वेळ का लागला? या विषयाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माझ्या महिला पदाधिकाऱ्यांनी वाचा फोडली, विषय लावून धरला, आणि त्यातून जनआक्रोशाला तोंड फुटलं.
मुळात हा महाराष्ट्राच्या…
— Raj Thackeray (@RajThackeray) August 21, 2024
दरम्यान, या प्रकरणामधील मुख्य आरोपी अक्षय शिंदेला 26 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या प्रकरणामध्ये कोणालाही पाठीशी घातलं जाणार नाही असं मुख्यमंत्र्यांबरोबरच गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.