देवेंद्र कोल्हटकर
दिशा सालियन प्रकरणी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या चौकशीसाठी एसआयटी गठीत करण्यात आली आहे. या एसआयटीबद्दल बोलताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी "आदित्य असं काही करेल असं वाटत नाही" असं मत व्यक्त केलं आहे. त्यांच्या वक्तव्यानंतर विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. मनसेचे पदाधिकारी आणि कार्यकर्तेही यावरुन आपल्या भावना व्यक्त करत आहेत. मनसेने नेहमीच शिवसेना उद्धव ठाकरे यांना मदत केली आहे, मात्र उद्धव ठाकरे यांनी मनसेच्या पाठीत नेहमी वार करण्याची भूमिका घेतली असल्याचं ते म्हणत आहेत.
मनसेचे सरचिटणीस कीर्ती कुमार शिंदे यांनीही फेसबुक पोस्टच्या माध्यमातून आपल्या भावना मांडल्या असून ती व्हायरल झाली आहे. "महाराष्ट्राच्या राजकारणातील मराठी माणसाचं महत्त्व, ठाकरे कुटुंबाचा दबदबा किंवा ठाकरे ब्रँड जपायचा असेल तर दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र यायला हवं, अशी ओरड नेहमीच ऐकू येते. सर्वसामान्य मराठी माणसाच्या भावनांचा हवाला देऊन तशा बातम्याही अधूनमधून माध्यमांत येत असतात. पण त्यात एक छुपा अजेंडा असतो, मनसेची बदनामी करण्याचा. मनसेची यांव चूक आहे, राजसाहेबांची त्यांव चूक आहे. जणू काही एकत्र येण्याची टाळी फक्त मनसेच्या एकाच हाताने वाजणार आहे," असं ते म्हणाले आहेत.
"प्रत्यक्षात गेल्या काही वर्षांतील घटना काहीतरी वेगळंच सांगतात. बाळासाहेब, उद्धवजी आणि अगदी आदित्यच्या; शिवसेनेच्या सगळ्या सुखदुःखात वैयक्तिक, राजकीय मतभेद बाजूला ठेवून राजसाहेब मोठ्या मनाने सहभागी झाले. मग तो विषय कौटुंबिक असो की राजकीय. स्वतः राजसाहेबांनी त्याबाबत अनेकदा अत्यंत मोकळेपणाने जाहीरपणे सांगितलं आहे. पक्षाचे ज्येष्ठ नेते बाळा नांदगावकर यांनीही दोन्ही ठाकरे बंधूंबाबतच्या त्यांच्या भावना अनेकदा मीडियापुढे व्यक्त केल्या आहेत. मातोश्री आणि कृष्णकुंज/ शिवतीर्थ इथल्या या दोन घरांनी एकत्र यावं यासाठी प्रयत्नही केले आहेत," असं त्यांनी सांगितलं आहे.
"पण एकीची ही टाळी कधी वाजलीच नाही. मातोश्रीत राहणाऱ्यांनी आपला खिशातला हात कधी बाहेर काढलाच नाही. टाळीसाठी पुढे केलाच नाही. उलट कट-कारस्थान रचत, 'मूंह में राम, बगल में छुरी' म्हणतात तसं मनसेचे नगरसेवक पळवले. इतकं होऊनही राजसाहेबांनी वरळी विधानसभा निवडणुकीत आदित्य ठाकरे यांच्या विरोधात मनसेचा उमेदवार दिला नाही. काही दिवसांनी "संपलेल्या पक्षावर मी बोलत नाही" असं म्हणत आदित्यने आपल्या राजकीय अपरिपक्वतेचं दर्शन घडवलं," अशी टीका त्यांनी केली आहे.
"इतकं सारं महाभारत घडूनही, दिशा सालियन मृत्यू प्रकरणात आदित्य ठाकरे यांचे नाव आल्यानंतर, चौकशीचा ससेमिरा मागे लावून आदित्यला तुरुंगात टाकण्यासाठी सत्ताधाऱ्यांचे हात शिवशिवत असतानाही शर्मिलावहिनी राजसाहेब ठाकरे यांनी आदित्यची पाठराखण केली. "आदित्य असं काही करेल असं वाटत नाही" हे मत त्यांनी जाहीरपणे, मीडियासमोर व्यक्त केलं. सरकारी यंत्रणांच्या विरोधात असं जाहीरपणे बोलायला हिंमत लागते. वैयक्तिक मतभेद बाजूला सारून आपल्या राजकीय-कौटुंबिक विरोधकांची बाजू समाजात सावरून धरायला खूप मोठं मन लागतं. ती हिंमत, ते मोठं मन कोणत्या ठाकरेंच्या घरात वसतं, हे महाराष्ट्राने पुन्हा एकदा अनुभवलं. शर्मिलावहिनींनी मराठी माणसाचं मन जिंकलं," अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या आहेत.