बीड: पेंडगावात जमावाकडून दोघांना बेदम मारहाण

घटनेबाबत माहिती मिळताच बीड ग्रामीणचे पोलीस तातडीने घटनास्थळी पोहचले.

Updated: Jul 2, 2018, 03:56 PM IST
बीड: पेंडगावात जमावाकडून दोघांना बेदम मारहाण title=

बीड: धुळ्यातील राईनपाडा येथे जमावाकडून झालेल्या मारहाणीत पाच जणांचा मृत्यू झाल्याने राज्यभरात खळबळ उडाली आहे. ही घटना ताजी असतानाच बीड शहरानजीक पेंडगाव येथे दोन लोकांना जमावकडून मारहाण झाल्याची घटना घडली आहे. घटनेबाबत माहिती मिळताच बीड ग्रामीणचे पोलीस तातडीने घटनास्थळी पोहचले. मारहाण झालेले दोघे जण मध्यप्रदेशमधील रहिवासी असल्याचे।स्पष्ट झाले मात्र तोपर्यंत जमावाने या दोघांना बेदम मारहाण केली होती त्यात ते जखमी झाले.

राईनपाडा घटनेनंतर राज्यभरात खळबळ

दरम्यान, राज्यात खळबळ उडवून देणाऱ्या धुळे येथील राईनपाड्यातल्या गावकऱ्यांनी केलेल्या मारहाण प्रकरणी आतापर्यंत २३ जणांना पोलीसांनी ताब्यात घेतलंय. आणखी काहींची ओळख पटल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली आहे. तसंच, मारहाणीनंतर फरार झालेल्या गावकऱ्यांच्या शोधासाठी पाच पथकं रवाना करण्यात आल्याचंही पोलिसांनी म्हटलंय. सोशल मीडीयातील अफेवमुळे झालेल्या हत्येमुळे राईनपाडा गाव देशभरात चर्चेत आलंय. रविवार संध्याकाळपासून गावात शुकशुकाट आहे. गावातले पुरुष फरार आहेत. अनेक घरांना कुलपं लागलीयत. राईनपाडा गावात मुलं पळवणारी टोळी शिरल्याची अफवा पसरल्यावर सोलापूर जिल्ह्यातल्या एकाच कुटुंबातल्या पाच जणांना गावात जमावानं अमानुष मारहाण केली. त्यात पाचही जणांचा मृत्यू झाला. त्यानंतर गावात सध्या भयाण शांतता आहे.

सरपंच, ग्रामसेवकांवर गुन्हा दाखल करा

धुळे मारहाण मृत्यू प्रकरणी पचंवीस लाखाची मदत आणि सरकारी नोकरीच्या आश्वासनासह, सरपंच तसंच ग्रामसेवकांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी, हत्याकांडातल्या मृतांच्या नातेवाईकांनी केली आहे. तसंच प्रशासनावरही त्यांनी रोष व्यक्त केला आहे.