वाशिम : वारंवार प्राणी असलेल्या भागातून वाहानं हळू चालवण्याची विनंती केली तरी काही लोक ऐकत नाहीत. सुसाट वाहनानं माकडाला उडवलं आणि त्यानंतर जे घडलं हे फार भयंकर आणि हृदयद्रावक दृश्यं होतं. महागाव-कारंजा मार्गावर अज्ञात वाहनानं एका माकडाला धडक दिली. अपघातात ते माकड गंभीर जखमी होऊन रस्त्यावरच पडलं.
या माकडाला तडफडत मरताना पाहून इतर माकडं भावुक झाली. मात्र त्यांना संतापही आला. काही वेळातच जखमी माकडाचा मृत्यू झाला. या घटनेने बिथरलेल्या कळपातल्या इतर 20 ते 30 माकडांनी एकच गोंधळ घातला. या माकडांनी माहमार्ग रोखून धरला.
मृत माकडाभोवती कळपातली सगळी माकडं गोळा झाली. या माकडाचा आक्रंदन पाहून रस्त्याने जाणारे वाहन चालकही स्तब्ध झाले. माणूस स्वतःच्या सुखसोयीसाठी प्राण्यांचा निवारा हिसकावून घेत आहे. ज्यामुळे जंगलातले प्राणी लोकवस्तीकडे धाव घेत आहेत.
माकडांना वारंवार रस्ता ओलांडावा लागतो. माकडांसाठी किंवा तिथल्या प्राण्यांसाठी गाड्या सावकाश चालवण्याचं आवाहन केलं जातं. मात्र अनेकदा पाळलं जात नाही आणि अशाच प्रकारातून वन्यप्राण्यांचा अपघाती मृत्यू होतो.
डोळ्यादेखत माकडाचा मृत्यू बघितल्याने बाकीची माकडे बिथरली. त्यांनी मग रस्ताच रोखून धरला. माकडे मृत माकडाभवती सतत फिरत राहिली. ही दृश्यं मनाला चटका लावणारी आहेत.