मुंबई: उकाड्याने हैराण झालेल्या लोकांना सर्वात मोठा दिलासा आहे. तर दुसरीकडे बळीराजाला सुखावणारी बातमी आहे. मान्सूनबाबत हवामान विभागाने दिलासादायक माहिती दिली.
पुढील दोन ते तीन दिवसांत मान्सून गोवा आणि कोकणाच्या दिशेने सरकेल असं हवामान विभागाने म्हटलं आहे. देशात यावर्षी दिलासादायक पाऊस होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला.
हवामान विभागाने मान्सूनबाबत दुसरा अंदाज जारी केलाय. यावर्षी देशात 96 टक्के ते 104 टक्के पाऊस होण्याचा अंदाज देण्यात आला आहे. देशाच्या 4 भागांचा विचार केला तर मध्य भारतात सामान्य म्हणजे 106 टक्के दीर्घकालीन पावसाचा अंदाज देण्यात आला.
हाच अंदाज दक्षिण पेनिन्सूलामध्ये 106 टक्के तर ईशान्य भारतात 96 ते 106 टक्के दीर्घकालीन पावसाचा अंदाज आहे. मान्सून कोअर झोन म्हणजे शेती सर्वाधिक असलेल्या मध्य भारतात सामान्य पाऊस होण्याचा अंदाज आहे.
सातारा जिल्ह्यातील दुष्काळी माण तालुक्यात दहिवडी, म्हसवड भागात अवकाळी पाऊसाने जोरदार हजेरी लावली. या पावसामुळे दुष्काळग्रस्तांना काही अंशी दिलासा मिळाला.
वादळी वाऱ्यासह पाऊस आल्यामुळे झाडं रस्त्यावर पडली.तर अनेक ठिकाणी घराचे पत्रे उडालेत. या पावसामुळे माण तालुक्याला चांगलंच झोडपून काढलं.
बीड जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी मान्सून पूर्व पावसानं जोरदार हजेरी लावली. वादळी वा-यासह जिल्ह्यातल्या आष्टी पाटोद्यात पाऊस बरसला. अनेक ठिकाणी झाडं उन्मळून पडली.
उन्हानं हैराण नागरिकांना या पावसानं दिलासा मिळाला. वातावरणात गारवा निर्माण झालाय. मान्सूनपूर्व पावसानंच जिल्ह्यात गारवा निर्माण केलाय.
कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात पुढचे दोन दिवस वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा वर्तवण्यात आला आहे. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे.