आनंदाची बातमी: मान्सूनचा पाऊस ८ जूनपर्यंत राज्यात दाखल होणार

३० मेपासून राज्यातील विविध भागांत मान्सूनपूर्व पावसाच्या सरी बरसायला सुरुवात होईल.

Updated: May 29, 2020, 08:19 AM IST
आनंदाची बातमी: मान्सूनचा पाऊस ८ जूनपर्यंत राज्यात दाखल होणार

पुणे: उन्हाच्या वाढत्या झळांमुळे त्रस्त झालेल्या महाराष्ट्रातील लोकांना लवकरच दिलासा मिळण्याची शक्यता आहे. कारण, मान्सूनचा पाऊस ८ जूनपर्यंत राज्यात दाखल होईल, असा अंदाज भारतीय हवामान खात्याने IMD वर्तवला आहे. त्यापूर्वी ३० मेपासून राज्यातील विविध भागांत मान्सूनपूर्व पावसाच्या सरी बरसायला सुरुवात होईल, अशी माहिती भारतीय हवामान खात्यातील शास्त्रज्ञ अनुपम कश्यपी यांनी दिली. त्यामुळे प्रचंड उष्णतेमुळे हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळणार आहे. 

हवामान खात्याने गुरुवारीच मान्सून १ जूनला केरळात दाखल होईल, असे म्हटले होते. अरबी समुद्रात मान्सूनच्या आगमनासाठी पोषक असणारा कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. त्यामुळे मान्सूनची पुढची वाटचाल विनासायास होईल, असे IMD ने म्हटले होते. 

भारतात या दिवशी दाखल होणार मान्सून, आयएमडीचा अंदाज

दरम्यान मालदीव-कोमोरिन परिसरात मान्सूनच्या पावसाला सुरुवातही झाली आहे. तसेच बंगालच्या उपसागराचा परिसर व अंदमान-निकोबार बेटांच्या परिसरातही काहीप्रमाणात मान्सूनच्या सरी बरसल्याचे हवामान खात्याने सांगितले आहे. 

मच्छिमारांना इशारा, पुढचे काही दिवस समुद्रात जाऊ नये

महाराष्ट्रातील बहुतांश शेती ही मान्सूनच्या पावसावर अवलंबून आहे. साधारण साडेचार महिने पडणारा पाऊस शेतीसाठी लागणाऱ्या ७० टक्के पाण्याची गरज पूर्ण करतो.  अशातच यंदा राज्यावर कोरोनासारखे भीषण संकट ओढावले आहे. त्यामुळे राज्यात समाधानकारक पाऊस पडल्यास अर्थव्यवस्था पुन्हा उभारी घेईल, असा जाणकारांचा अंदाज आहे. भारताची अर्थव्यवस्था ही आशिया खंडातील तिसरी मोठी अर्थव्यवस्था आहे. हवामान खात्याने यापूर्वी वर्तविलेल्या अंदाजानुसार, यंदाचे पर्जन्यमान १०० टक्के असेल.