Monsoon Malshej Ghat : यंदाच्या वर्षी ठरलेल्या मुहूर्ताआधीच महाराष्ट्रात मान्सून दाखल झाला. राज्याच्या कोकण पट्ट्यापासून मराठवाड्यापर्यंत या पावसाच्या सरींनी मजल मारली असून, नैऋत्य मोसमी वाऱ्यांच्या हजेरीमुळं घाटमाथ्यावरील परिसर खऱ्या अर्थानं खुलून निघण्यास सुरुवात झाली आहे. मान्सूनची सुरुवात झाली, म्हटल्यावर अनेकांच्याच उत्साहाला पारावार राहत नाही, यावेळीसुद्धा परिस्थिती वेगळी नसेल.
महाराष्ट्रात मान्सून म्हणजे भटकंती, डोंगरवाटांवर निघणारे ट्रेक, पावसाच्या सरींमधून निघणाऱ्या मान्सून राईड असंच एकंदर चित्र पाहायला मिळतं आणि या साऱ्यामध्ये काही ठिकाणांना कमालीची पसंती मिळते.
मुंबई- पुणं म्हणू नका किंवा मग राज्याचा आणखी कोणता भाग, पावसाळ्याचं खरं सौंदर्य अनुभवायचं असेल, तर कल्याणला जुन्नर लेण्याद्रीशी जोडणाऱ्या माळशेज घाटाला अनेकांचीच पसंती असते. शहरी भाग मागे पडून हळुहळू सुरु होणारी गावठाणं आणि त्यानंतर लगेच येणारा डोंगरातील चढ पाहताना हा घाट वेगळात अनुभव इथं येणाऱ्यांना देत असतो. प्रचंड विस्तीर्ण, उंच आणि तीक्ष्ण अशा खडकाळ भींतींवरून वाहणारे, पावसामुळं तयार झालेले लहानमोठे धबधबे म्हणजे पावसाळ्यातील या घाटीच शानच. यंदाच्या वर्षीसुद्धा माळशेजमध्ये हे असंच चित्र पाहायला मिळेल किंबहुना त्याची सुरुवातही य. पण, एक अडचण आहे... झालीय. पण, एक अडचण आहे...
कल्याण-नगर महामार्गावरील माळशेज घाटाला बाईकर्स असो किंवा इतर कोणी, अनेकांचीच पसंती. पण, याच घाटाचील रस्त्याची अक्षरश: चाळण झाली असून भलेमोठे खड्डे पडले आहे. त्यामुळे या ठिकाणावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना प्रचंड मनस्ताप सहन कराव लागत आहे. पावसाळ्यात माळशेज घाटात प्रचंड पाऊस आणि धुकं असतं त्यामुळे या खड्ड्यांमुळे मोठा अपघात होण्याचा धोका यामुळं आणखी वाढत आहे. पुढील काही दिवसात इथं येणाऱ्या वाहनांचा ओघ आणखी वाढण्याची चिन्हं असली तरीही धोका काही कमी नाही हे लक्षात घेणं महत्त्वाचं.
माळशेजमधील हे खड्डे बुजवण्याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्यामुळं यंदाच्या पावसाळ्यात माळशेज घाटात पर्यटनासाठी येणाऱ्या प्रवाशांसह पर्यटकांना याचा मोठा फटका बसणार आहे. याचा थेट परिणाम घाटात असणाऱ्या अनेक लहानमोठ्या दुकानदारांनाही बसताना दिसेल. त्यामुळं आता ही परिस्थिती लवकरात लवकरत सुधारावी अशीच स्थानिकांची मागणी आहे.