तो आलाय...! अरबी समुद्रातील हालचाली वाढताच Monsoon तळकोकणात येण्याची तारीख ठरली

Monsoon Update : तो आलाय.... अतीप्रचंड वेगानं आलाय....; हे असं काहीतरी कोणा पाहुण्यासाठी किंवा सेलिब्रिटीसाठी नव्हे तर चातकासारखी वाट पाहिली जाणाऱ्या मान्सूनबद्दल म्हटलं जात आहे. 

Updated: May 25, 2023, 10:28 AM IST
तो आलाय...! अरबी समुद्रातील हालचाली वाढताच Monsoon तळकोकणात येण्याची तारीख ठरली  title=
(छाया सौजन्य- स्कायमेट) Monsoon to reach at konkan around 7 june latest weather Update in marathi

Monsoon News : राज्यातील वाढता उकाडा पाहता, नागरिकांना येत्या दोन ते तीन दिवसांत या परिस्थितीतून दिलासा मिळणार असल्याची माहिती देत हवामानच विभागानं राज्यात पर्जन्यमानाचा अंदाज वर्तवला. एकिकडे नागरिकांना उकाड्यापासून किमान दिलासा मिळण्याबाबतचं वृत्त समोर आलेलं असतानाच दुसरीकडे आता चक्क मान्सूनचीच खबरबात कळत आहे. ज्यामुळं शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर नक्कीच आनंद पाहायला मिळेल. कारण, सर्वांनाच हवाहवासा वाटणारा मान्सून आता अवघ्या काही दिवसांतच तळकोकणात दाखल होणार आहे. 

हेसुद्धा वाचा : Maharashtra Weather Forcast : आजचा दिवस उकाड्याचा; मान्सूनच्या प्रतीक्षेचा; हवामान विभागाच्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष करू नका 

काय म्हणतंय हवामान खातं? 

सध्याच्या घडीला अरबी समुद्रातून वाहणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्यांचा वेग आता वाढू लागला आहे. तिथं सुरु असणाऱ्या या हालचाली पाहता मान्सन केरळात 1 जून आणि महाराष्ट्राच्या तळ कोकणात7 जून रोजी दाखल होईल असा अंदाज हवामान खात्यानं व्यक्त केला आहे. मान्सूनसाठीची पूरक स्थिती आणि वाऱ्यांचा वेग पाहता ते केरळात तीन दिवस आधी, म्हणजेच 4 जूनऐवजी 1 जूनला दाखल होतील. वाऱ्यांचा हाच वेग कायम राहिल्यास महाराष्ट्रात यायला मान्सूनला फार वेळ लागणार नाही. त्यामुळं आता या बहुप्रतिक्षीत मान्सूनच्या आगमनासाठी अवघे काही दिवस उरले हेच स्पष्ट होत आहे. 

कुठवर पोहोचलाय मान्सून? 

काही दिवसांपूर्वी अंदमानात पोहोचलेला मान्सून सध्या बंगालच्या उपसागरी क्षेत्रावर असून, त्याचा वेग सकारात्मक असल्याचं म्हटलं जात आहे. दरम्यान, देशावर हिमालयाकडून पश्चिमी झंझावात सक्रीय असून, सध्या पश्चिमी चक्रवातही निर्माण झाला आहे. ज्यामुळं अनेक राज्यांना पाऊस ओलाचिंब करताना दिसत आहे. महाराष्ट्रापासून तामिळनाडूपर्यंत हा प्रभाव सर्वाधिक दिसत आहे. 

मान्सूनचं सांगावं तर तो, निकोबार बेटावरही घोंगावत आहे. पण, तिथं वाऱ्याला अपेक्षित वेग नाही. इथे अरबी समुद्रात मात्र बाष्पयुक्त वारे दाखल झाल्यामुळं मान्सूनसाठी पूरक परिस्थिती निर्माण होताना दिसत आहे. हे एकंदर चित्र पाहता 27 मेनंतर हे वारे आणखी वेग घेतील असा अंदाज आहे. मोखा चक्रीवादळामुळं काहीसे रेंगाळलेले हे वारे आता पुन्हा मार्गस्थ होत असून, त्यांना महाराष्ट्र गाठण्यासाठी फार वेळ लागणार नाही, असं हवामान विभागाकडून सांगण्यात आलं आहे. 

दरम्यान, सध्याच्या घडीला यंदाच्या मान्सूनव अल निनोचा प्रभाव असल्याची चिंताही व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळं आयएमडीच्या वृत्तानुसार मान्सून सर्वसाधारण असेल की सरासरीहूनही त्याचं प्रमाण कमी असेल, याबाबत मात्र मतभिन्नता पाहायला मिळत आहे.