Cyclone Biporjoy मुळं महाराष्ट्रात यलो अलर्ट; पाहा कोणत्या भागाला सावधगिरीचा इशारा

Maharashtra Weather News : महाराष्ट्रासह देशाच्या बहुतांश भागांतील हवामानानं आता आपलं रुप बदललं असून मान्सूनच्या आगमानाचे थेट परिणाम या हवामानामध्ये पाहायला मिळत आहेत.   

सायली पाटील | Updated: Jun 12, 2023, 06:51 AM IST
Cyclone Biporjoy मुळं महाराष्ट्रात यलो अलर्ट; पाहा कोणत्या भागाला सावधगिरीचा इशारा  title=
Monsoon updates Cyclone Biporjoy Maharashtra weather forecast latest updates

Maharashtra Weather News : गेल्या काही दिवसांपासून वाढत जाणाऱ्या उकाड्यामुळं महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यांमध्ये नागरिक हैराण झाल्याचं पाहायला मिळालं. मागील आठवड्याचा शेवट जरी उन्हाच्या झळांनी झाला असला तरीही नव्या आठवड्याची सुरुवात मात्र अतिशय सुरेख अशीच होणार आहे. कारण, मान्सूननं राज्यात प्रवेश केला आहे. असं असलं तरीही राज्याच्या किनारपट्टीवरून पुढे सरकलेल्या Cyclone Biporjoy चे परिणामही सध्या पाहायला मिळत आहेत. (Monsoon updates Cyclone Biporjoy Maharashtra weather forecast latest updates )

(Monsoon updates ) हवामान तज्ज्ञ के.एस. होसाळीकर यांनी ट्विट करत दिलेल्या माहितीनुसार रविवारी राज्यातील काही भागात नैऋत्य मान्सूनचं आगमन झालं. परिणामी (Konkan) दक्षिण कोकणातील काही भाग, दक्षिण मध्य महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक आणि तामिळनाडूसह आंध्र प्रदेशातील काही भाग या मान्सूननं व्यापला.  राज्यात आलेल्या मान्सूननच्या वाऱ्यांचा वेग आणि एकंदर परिस्थिती पाहता पुढच्या चार ते पाच दिवसांत अर्थात 15 - 16 जूनपर्यंत राज्यातील बऱ्याच भागांमध्ये वादळी वारे आणि मेघगर्जनेसह पर्जन्यमानाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. काही भागांना पुढील दोन दिवसांसाठी यलो अलर्टही देण्यात आल्याचं हवामानशास्त्र विभागाकडून सांगण्यात येत आहे. 

यलो अलर्ट पावसाचा की वादळाचा? 

तिथं मान्सूनची वाटचाल सकारात्मकरित्या सुरु झालेली असतानाच इथं हवामान विभागानं यलो अलर्ट दिला आहे. पण, हा अलर्ट मान्सूनच्या धर्तीवर नसून बिपरजॉय या चक्रिवादळामुळं बदलणाऱ्या हवमानाच्या धर्तीवर देण्यात आला आहे. सध्याच्या घडीला हे वादळ मुंबई आणि महाराष्ट्राच्या किनाऱ्यांवरून दूर असलं तरीही त्याचे परिणाम मात्र गोव्यासह कोकण किनारपट्टीवरही दिसणार आहेत. शिवाय विदर्भातही पुढील तीन दिवस विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा देण्यात आला असून, हा हवामान विभागाचा यलो अलर्ट असल्याचं सांगण्यात येत आहे. 

हेसुद्धा वाचा : 'वारकऱ्यांनी बॅरिकेड्स तोडून शिरण्याचा प्रयत्न केला म्हणून...'; देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं कारण!

 

इथं मुंबईमध्येही रविवारपासूनच पावसानं हजेरी लावली असून, शहरातील मरिन ड्राईव्ह, गेट वे, गिरगाव चौपाटीसह इतरही किनाऱ्यांवर मोठमोठ्या लाटा उसळण्यास सुरुवात झाली आहे. ज्यामुळं सध्या नागरिकांना किनाऱ्यांच्या जवळ जाण्यापासून पोलीस यंत्रणा रोखताना दिसत आहे. 

देशातील हवामानाची काय परिस्थिती? 

Skymet या खासगी संस्थेच्या माहितीनुसार पुढील 24 तासांमध्ये पूर्वोत्तर भारताम्ये जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर, केरळ, कर्नाटकसह अंदमान आणि निकोबार बेट समुहांमध्येही पावसाची हजेरी पाहायला मिळू शकते. तिथं सिक्कीमसह हिमालय पर्वतरांगांच्या क्षेत्रामध्येही पावसासह बर्फवृष्टीचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. सध्याच्या घडीला दक्षिण किनारपट्टीवरून प्रवास करणाऱ्या मान्सूनचा वेग चांगला असल्यामुळं तो येत्या काळात मोठं क्षेत्र व्यापेल असंही सांगण्यात आलं आहे.