रत्नागिरीत पावसामुळे बळीराजा सुखावला

मुंबई : रत्नागिरीत  गेल्या दोन दिवसात झालेल्या पावसामुळे बळीराजा सुखावला आहे. कोकणातला शेतकरी आता पारंपारिक नांगरणीबरोबरच आधुनिक पद्धतीचाही वापर करू लागला आहे. त्यामुळे शेतकरीही आता काळाबरोबर बदलू लागलाय असं म्हणायला हरकत नाही. केरळात मान्सून दाखल झाल्यामुळे कोकणातही गेल्या दोन दिवसांपासून मान्सूनपूर्व पावसाने  हजेरी लावली आहे. त्यामुळे शेतात राबणाऱ्या बळीराजासह नांगर तयार करण्यासाठी मदत करणारा सुतारही सुखावला आहे. 

मात्र सध्या अनेक शेतकरी नांगरणीसाठी ट्रॅक्टरचा वापर करत असल्याने पूर्वी इतके लाकडी नांगर शेतात दिसत नाहीत. पूर्वी गावात शंभर नांगर असायचे. मात्र आता दहा ते पंधराच नांगर दिसतात. त्याचा परिणाम नांगर तयार करणाऱ्या सुतारांवर झाला आहे. कोकणातील छोटे शेतकरी आजही याच पारंपरिक नांगराचा वापर करतात. 

काळाबरोबर बदललच पाहिजे असंही काही शेतकऱ्यांना वाटतंय. पारंपरिक पद्धतीने शेती करण्यापेक्षा आधुनिक पद्धतीने साधनांचा वापर करत शेती केली तर वेळेची आणि पैशाची बच होत असल्याचे शेतकरी सांगत आहेत. पारंपरिक शेतीला आधुनिकतेची जोड मिळतेय. मान्सूनपूर्व पावसाला कोकणात सुरूवात झाली की लगेच शेतीसाठी लागणारी अवजारं तयार करण्यासाठी वेग येतो आणि शेतकरीदेखील याकडे जातीने लक्ष देतात. काळाप्रमाणे आता कोकणातला शेतकरी बदलू पाहतोय ही चांगली बाब आहे. मात्र आता निसर्गानेही चांगली साथ द्यावी हीच अपेक्षा बळीराजा व्यक्त करत आहे.