नीरा-देवघर पाणी प्रश्नावरुन खासदार उदयनराजेंचा राष्ट्रवादीला घराचा आहेर

उदयनराजे भोसले यांचे खडे बोल

Updated: Jun 13, 2019, 12:14 PM IST
नीरा-देवघर पाणी प्रश्नावरुन खासदार उदयनराजेंचा राष्ट्रवादीला घराचा आहेर title=

सातारा : नीरा देवघर पाण्यावरून खासदार उदयनराजे भोसले यांनी पक्षाला घराचा आहेर दिला आहे. रामराजे नाईक निंबाळकर यांचे नाव न घेता त्यांनी टीका केली आहे. १४ वर्षात अध्यादेश का काढला नाही? असा सवालही उदयनराजेंनी केला आहे. भगीरथ म्हणून घेणाऱ्यांनी लाल बत्तीचा वापर केला आणि लोकांची खिल्ली उडवण्यापलीकडे काही केले नाही, त्यांना देवसुद्धा माफ करणार नाही. अशा शब्दात त्यांनी टीका केली आहे.

नीरा देवघर धरणाचे बारामतीकडे जाणारे पाणी माढ्याकडे वळवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. जलसंपदा खात्याने अध्यादेश काढल्याची माहिती खासदार रणजितसिंह निंबाळकर यांनी दिली होती. नीरा डाव्या कालव्याचा वाद वाढल्यानंतर राज्य सरकारने बारामतीला जाणारे ६० टक्के पाणी हे माढ्याला देण्याचे आदेश दिले होते.

जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी काही दिवसांपूर्वी माढ्याला हक्काचे पाणी मिळणार, असे वक्तव्य केले होते. खासदार रणजीतसिंह नाईक-निंबाळकर आणि माजी खासदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे पाणी देण्याबाबत पाठपुरावा केला होता. त्‍यानंतर महाजन यांनी बारामतीचे पाणी वळविण्याचे आदेश काढले आहेत. दरम्यान, बारामतीचे पाणी दुसरीकडे वळविण्यात आल्यानंतर शरद पवार कोणती भूमिका घेतात, याकडे लक्ष लागून राहिले आहे.