नो टेन्शन ! लसीचे दोन डोस घ्या आणि बुरशीपासून संरक्षण मिळवा

राज्यात काही जिल्ह्यांमध्ये कोरोनाचे (Corona) रुग्ण कमी होतायत, पण म्युकरमायकोसिसचे (Mucormycosis) रुग्ण वाढत आहेत. म्युकरमायकोसिस टाळायचा असेल तर काय करायचं, याबद्दल शास्त्रज्ञांनी महत्त्वाचा अभ्सास केला आहे.  

Updated: Jun 17, 2021, 06:56 PM IST
नो टेन्शन ! लसीचे दोन डोस घ्या आणि बुरशीपासून संरक्षण मिळवा title=

प्रशांत परदेशी / धुळे : राज्यात काही जिल्ह्यांमध्ये कोरोनाचे (Corona) रुग्ण कमी होतायत, पण म्युकरमायकोसिसचे (Mucormycosis) रुग्ण वाढत आहेत. म्युकरमायकोसिस टाळायचा असेल तर काय करायचं, याबद्दल शास्त्रज्ञांनी महत्त्वाचा अभ्सास केला आहे. पाहुया कशामुळे टाळता येईल म्युकरमायकोसिस. कोरोनाविरोधातल्या दोन लसी (Corona vaccine) घेतल्या तर म्युकरमायकोसिस अर्थात काळ्या बुरशीचा धोका नाही, असं एका अभ्यासादरम्यान समोर आलंय. धुळ्यातल्या भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांत म्युकरमायकोसिसच्या 300 रुग्णांच्या मदतीनं हा अभ्यास करण्यात आला.  

कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांना म्युकरमाक्रोसीसचा धोका नसल्याचं हिरे वैद्यकीय महाविद्यालयात करण्यात आलेल्या अभ्यासात समोर आले आहे. याबाबतचा अहवाल देखील मुंबईतील वैद्यकीय शिक्षण व संशोधन मंडळाला पाठवण्यात आला आहे. या विश्लेषणाचा देश पातळीवर उपयोग होणार असून, म्युकरचा त्रास होऊ नये यासाठी लसीकरण करणे गरजेचे असल्याचे अधिष्ठाता डॉ पल्लवी सापळे यांनी सांगितले आहे.

हिरे महाविद्यालयात 300 म्युकर मॅक्रोसिसची लागण झालेल्या रुग्णांचा अभ्यास करण्यात आला आहे. यात त्यांना कोरोनाची लागण झाली होती का, त्यांनी उपचार कुठे घेतले, त्यांचा वयोगट, म्युकरच्या रुग्णांनी कोरोनाची लस घेतली होती का, असा सर्व अभ्यास करण्यात आला. या अभ्यासात कोरोनाच्या दोन्ही लस घेतलेल्या व्यक्तींना म्युकरचा धोका नसल्याचे समोर आल्याचे महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ पल्लवी सापळे यांनी स्पष्ट केले आहे. याबाबत टास्क फोर्समध्ये देखील या माहितीचे विश्लेषण करण्यात आले आहे.

कोरोना झाल्यावर जास्त प्रमाणात स्टेरोईडस देण्यात आलेकिंवा चुकीचे औषधोपचार झाले तर म्युकरमायकोसिसचा धोका असतो. पण लसीचे दोन डोस घेतल्यावर मुळात कोरोना होण्याची शक्यताच कमी असते, लसीचे दोन डोस घेतल्यावर हॉस्पिटलमध्ये अॅडमिट होण्याची वेळ येत नाही. त्यामुळे पर्यायानं म्युकरमायकोसिसचा धोकाही कमी होतो. राज्यात बुरशीमुळे तब्बल 83 टक्के मृत्यू वाढले. त्यामुळे जीवघेण्या बुरशीला रोखण्यासाठी लवकरात लवकर लस घ्या.