Mukesh Ambani Gift Worth Rs 351 Crore: रिलायन्स रिटेलचा आयपीओ (Reliance Retail IPO) लवकरच बाजारामध्ये दाखल होणार असल्याची चर्चा आहे. मात्र यापूर्वीच भारतामधील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक असलेल्या मुकेश अंबानींच्या मालकीच्या कंपनीने काही निवडक कर्मचाऱ्यांना एम्पॉइ स्टॉक ऑप्शन प्लॅन्स म्हणजेच ईएसओपीच्या माध्यमातून तब्बल 351 कोटींचं बक्षिस देणार आहे. कंपनीने अव्वल 15 वरिष्ठ अधिकाऱ्यांना ही रक्कम शेअर्सच्या माध्यमातून देणार असल्याचं समजतं. रिस्टार ऑफ कंपनीजला रिलायन्सने मागील आर्थिक वर्षासंदर्भात दिलेल्या माहितीमधून हे समोर आलं आहे.
रिलायन्स इंडस्ट्रीजच्या रिलेट विभागाने वरिष्ठ अधिकाऱ्यांसाठी एकूण 4.417 मिलियन शेअर्स जारी केले आहेत. या प्रत्येक शेअरची किंमत 796.5 रुपये इतकी आहे. कंपनीचा आयपीओ बाजारामध्ये यंदाच्या आर्थिक वर्षामध्ये आला तर हे शेअर्स कर्मचाऱ्यांना ईएसओपीमधून दिले जातील अशी कंपनीची तयारी असल्याचं रिस्टार ऑफ कंपनीजला रिलायन्सने कळवलं आहे.
ज्या वरिष्ठ कर्मचाऱ्यांना ईएसओपीमधून हे शेअर्स देण्यात आले आहेत त्यामध्ये व्ही सुब्रमण्यम (संचालक), कौशल नेवरेकर (इलेक्ट्रॉनिक्स रिटेलचे अध्यक्ष आणि मुख्य व्यवसाय अधिकारी), दामोदर मॉल (किराणा रिटेलचे मुख्य कार्यकारी), विनीत नायर (Ajio चे CEO, फॅशन ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म), अखिलेश प्रसाद (फॅशन आणि लाइफस्टाइल बिझनेस विभागाचे अध्यक्ष आणि सीईओ) आणि अश्विन खासगीवाला (ग्रुप चीफ बिझनेस ऑपरेशन्स) या पाच प्रमुख अधिकाऱ्यांचा समावेश आहे. त्याच प्रमाणे या शेअर्समधील काही वाटा ज्या वरिष्ठ कर्मचाऱ्यांना दिला जाणार आहे त्यामध्ये केतन मोदी (एफएमसीजी व्यवसायाचे सीओओ), कामदेबा मोहंती (किराणा किरकोळ आणि जिओमार्टचे सीओओ), विपिन त्यागी (रिलायन्स ट्रेंडचे सीओओ) आणि प्रतीक माथूर (रणनीती आणि प्रकल्पांचे प्रमुख) यांचा समावेश आहे. आता शेअर्सचं वाटप समान होणार आहे की वेगवेगळ्या टप्प्यात हे स्पष्ट झालेलं नाही. समान वाटप झाल्यास या पंधरा जणांपैकी प्रत्येकाला 23 कोटी 40 लाख रुपयांचे शेअर्स मिळतील.
एकूण दुकाने, नफा आणि विक्रीचा विचार केल्यास रिलायन्स रिटेल ही भारतामधील सर्वात मोठी रिटेल कंपनी आहे. रिलायन्स रिटेलच्या माध्यमातून अन्नधान्य, किराणा, इलेक्ट्रॉनिक वस्तू, स्मार्टफोन्स, कपडे, बीटूबी होलसेल विक्री केली जाते.
रिलायन्स रिटेलच्या एकूण कमाईमध्ये 15 ठक्क्यांनी वाढ झाली असून मागील आर्थिक वर्षामध्ये या माध्यमातून कंपनीने 2 लाख 58 हजार 388 कोटींची कमाई केली आहे. निव्वळ नफा 26 टक्क्यांनी वाढला असून नफा 8 हजार 875 कोटी रुपये इतका आहे.