अलिबाग : कोकणात मुंबई - गोवा महामार्गाची पुरती दुरवस्था झाली आहे. गेली अनेक वर्षे या रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम रखडले आहे. रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडलेत. त्यातून वाहन चालवणं चालकांना जिकिरीचं होऊन बसले आहे. परिणामी वाहनांचा वेग मंदावतो आणि सातत्यानं वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत आहे. सगळीकडे धुळीचे साम्राज्य पसरले आहे. वाहतूक पोलीसही यापुढे हतबल झालेत.
वाहने नादुरुस्त होण्याचे प्रमाणही वाढले आहे. कोकणच्या पर्यटन व्यवसायावर या रस्त्याच्या दुरवस्थेचा परिणाम झाला आहे. या रस्त्यावरून ये जा करणारे प्रवासी सरकारच्या नावाने बोटं मोडत असतात. परंतु याचं कोणालाच सोयर सुतक दिसत नाही, अशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.
मुंबई - गोवा महामार्गाचे रुंदीकरणाचे काम सुरु आहे. काही ठिकाणी अर्धवट स्थितीत दिसत आहे. तसेच त्यातच रस्त्यावरील खड्डे आणि बेशिस्त वाहनचालक यामुळे वाहन कोंडीत भर पडत आहे. रायगडमधील पेण ते वडखळ दरम्यान वाहनांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळत आहे. या सहा किलोमीटर्सच्या अंतरासाठी ३ ते ४ तास वेळ लागत आहे.