अपहरण आणि हत्येच्या दोन आरोपींची निर्दोष सुटका

बारा वर्षांचा मुलगा श्री याचे मे २०१२मध्ये अपहरण करून हत्या करण्यात आली होती.

Updated: Aug 14, 2019, 06:34 PM IST
अपहरण आणि हत्येच्या दोन आरोपींची निर्दोष सुटका title=

बागेश्री कानडे, झी मीडिया, मुंबई :  कामावरून काढून टाकल्याच्या रागातून दुकान मालकाच्या मुलाचे अपहरण करून त्याची निर्घृण हत्या करणाऱ्या आरोपीला मुंबई सेशन कोर्टाने फाशीची शिक्षा सुनावली होती. ही फाशीची शिक्षा आज मुंबई उच्च न्यायालयानं रद्द केली. तसंच दुसऱ्या एका आरोपीची जन्मठेपेची शिक्षाही रद्द करून निर्दोष सुटका केली आहे. या घटनेत तपास यंत्रणा कुचकामी ठरली आहे. पोलीस तपासात हयगय केल्याचे समोर आले आहे.

धारावीतील दुकान मालक राजेश भांगडे यांचा बारा वर्षांचा मुलगा श्री याचे मे २०१२मध्ये अपहरण करून हत्या करण्यात आली होती. कामावरून काढून टाकल्याच्या रागातून इम्तियाज शेख आणि आझाद मेहमुदुल्ला अन्सारी यांनी श्री याला भिवंडीत नेले आणि तिथे त्याची हत्या करून मृतदेह एका मॅनहोलमध्ये टाकला होता. 

या प्रकरणी त्यांना अटक झाल्यानंतर सत्र न्यायालयाने मे २०१८मध्ये इम्तियाजला फाशीची शिक्षा आणि अन्सारीला जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. मुंबई उच्च न्यायालयाने आज आरोपी इम्तियाजची फाशीची शिक्षा आणि अन्सारीला ठोठावलेली जन्मठेपेची शिक्षा रद्द केली.

या खटल्यात सुरुवातीला पाच आरोपी होते. यापैकी दोन जणांना सेशन कोर्टाने निर्दोष सोडलं. आरोपी अल्पवयीन होता. त्याच्या विरोधात वेगळा खटला चाललं. उरलेले दोन आरोपींपैकी एक इम्तियाज शेख याला फाशी तर अन्सार आझाद याला जन्मठेव झाली होती. यामध्ये तपास करताना तांत्रिक दृष्ट्या आक्षेप घेण्यात आले होते.

पोलिसांनी ज्यादिवशी अटक दाखवली आणि प्रत्यक्षात अटक यात साम्य नव्हतं.

ज्या मोबाईल वरून खंडणी मागितली तो पुरावा सिद्ध करता आला नाही. 

मोबाईलचा आयएमईआय नंबरही सिद्ध होऊ शकला नाही. 

मृतदेहाचा पंचनामा करताना प्रत्येक आरोपीप्रमाणे पंचनामा बदलत गेला. या काही तांत्रिक बाबींला उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले.