शीव स्थानकात महिलेला धक्का लागला, जोडप्याची तरुणाला बेदम मारहाण, रुळांवर पडून दुर्दैवी मृत्यू

Mumbai Local Accident Today: मुंबई लोकलमध्ये चाललंय काय असा प्रश्व सध्या सर्वसामान्यांना पडला आहे. लोकलमध्ये महिलांच्या सुरक्षिततेवर वारंवार प्रश्न उपस्थित होत आहेत. 

मानसी क्षीरसागर | Updated: Aug 16, 2023, 07:33 PM IST
शीव स्थानकात महिलेला धक्का लागला, जोडप्याची तरुणाला बेदम मारहाण, रुळांवर पडून दुर्दैवी मृत्यू title=
mumbai local passenger brutally beten by couple at sion local station

Mumbai Local: मुंबई लोकलमधील भांडणे आणि वाद काही नवीन नाहीत. क्षुल्लक कारणावरुन  झालेले वाद कधीकधी टोक गाठतात. कधीकधी भांडणातून मोठी दुर्घटनाही घडू शकते. असाच एक प्रकार सोमवारी शीव रेल्वे स्थानकात घडला आहे. महिलेला धक्का लागल्यामुळं दाम्पत्याने एका तरुणाला शीव रेल्वे स्थानकावर बेदम मारहाण केली आहे. त्यावेळी हा तरुण फलाटावरुन रेल्वे मार्गावर पडला त्यातच त्याचा अपघाती मृत्यू झाला आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. (Mumbai Local Accident) 

दिनेश राठोड असं मृत व्यक्तीचे नाव असून तो नवी मुंबईतील घणसोली गावातील रहिवासी आहे. बेस्टमध्ये वाहकपदावर कार्यरत होते. सोमवारी 13 ऑगस्ट रोजी दिनेश जिन्यावरुन फलाट क्रमांक 1 वर आला होता. त्यावेळी एका महिलेला त्याचा धक्का लागला. धक्का लागल्यानंतर संतापून या महिलेने त्याला छत्रीने मारळ्यास सुरुवात केली. नंतर तिच्यासोबत असलेल्या एका व्यक्तीनेही दिनेश याला मारहाण करण्यास सुरुवात केली. 

जोडप्याने दिनेशला बेदम मारहाण करत असतानाच तो तोल जावून रेल्वे रुळांवर पडला. रुळांवर पडल्यानंतर तो तिथून उठण्याचा प्रयत्न करत होता. हळूहळू फलाटावर येण्याचा प्रयत्न करत असताना त्याला धीम्या लोकलने धडक दिली. लोकलच्या धडकेत तो गंभीर जखमी झाला. दिनेश राठोडला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र तिथे उपचारादरम्यान त्याचा मृ्त्यू झाला. 

दादर रेल्वे पोलिसांनी या प्रकरणी निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल केला आहे. तर, अविनाश माने आणि शीतल माने या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. दोघेही कोल्हापुरातील रहिवासी आहेत. मंगळवारी दादर रेल्वे पोलिसांनी त्यांना अटक केली आहे. तर, शीव स्थानकातील सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला आहे. 

दरम्यान, काही दिवसांपूर्वी नवी मुंबई लोकलमध्येही एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता. महिलांच्या डब्यात तैनात असलेल्या पोलिसाला शिवीगाळ करुन मारहाण केल्याची घटना रविवारी घडली आहे. रविवारी रात्री ट्रान्स हार्बर रेल्वे मार्गावर हा प्रकार घडला आहे. जुईनगर रेल्वे स्थानकात लोकल आल्यानंतर. त्याचवेळी आरोपी महिलांच्या डब्यात चढला. आरोपी तेव्हा दारूच्या नशेत होता. पोलीस शिपाई आकाश भारुड यांच्या हे लक्षात आल्यानंतर त्यांनी त्याला हटकले व पुढील स्टेशन आल्यानंतर त्याला जनरल डब्यात जाण्यास सांगितले. मात्र, आरोपीने रागाच्या भरात त्यांना शिवागाळ व मारहाण करण्यास सुरुवात केली.