अटल सेतूमुळं 'ट्रॅफिक' जॅम, आता करणार वाहतुकीत बदल; असे आहेत पर्यायी मार्ग

Atal Setu Bridge Traffic: अटल सेतूमुळं दक्षिण मुंबईत काही प्रमाणात वाहतुक कोंडीची समस्या निर्माण होत आहे. त्यावर वाहतूक विभागाने तोडगा काढण्याचा प्रयत्न केला आहे.  

मानसी क्षीरसागर | Updated: Jul 1, 2024, 09:01 AM IST
अटल सेतूमुळं 'ट्रॅफिक' जॅम, आता करणार वाहतुकीत बदल; असे आहेत पर्यायी मार्ग title=
Mumbai News Atal Setu Bridge Sees Surge in Traffic traffic diverted P D’Mello Road

Atal Setu Bridge Traffic: अटल सेतूमुळं मुंबई ते नवी मुंबई प्रवासाचे अंतर कमी झाले असले तरी अनेकदा अटल सेतूमुळं वाहतुक कोंडीत वाढ झाल्याचेदेखील चित्र आहे. अटल सेतू मार्गावरुन जाणाऱ्या वाहनांमुळं सकाळी आणि संध्याकाळी पी डिमेलो मार्गावर वाहनांच्या वेगाला ब्रेक लागत आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. त्यामुळं अटल सेतूवरुन वाचलेला वेळ ट्रॅफिक जॅममध्ये खर्ची जातो, अशी प्रवाशांची तक्रार आहे. त्यामुळंच प्रशासनाने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. येथील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी सहा महिन्यांसाठी वाहतुकीत बदल करण्यात येणार आहेत. 

एस.व्ही.पी. रोड (वाडीबंदर जंक्शन) येथून उजवे वळण घेऊन पी. डिमेलो रोडच्या दक्षिण वाहिनीवर जाणाऱ्या वाहतुकीस पुढील 180 दिवस निर्बंध घालण्यात आले आहेत, मुंबई वाहतूक पोलिसांनी अशी माहिती दिली आहे. अटल सेतूवरुन ये-जा करणाऱ्या वाहनांमुळं सर जे.जे. रोड, इब्राहिम रेहमतुल्ला रोड, मोहम्मद अली रोड, पी. डिमेलो रोडवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. त्यामुळं अटल सेतूवर वाचलेला वेळ या वाहतुक कोंडीत गेल्याने मुंबईकर हैराण झाले होते. यावर तोडगा काढण्यासाठी वाहतुक विभागाने वाहतुकीत बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. 

मुंबई ते नवी मुंबई या दोन शहरांना जोडण्यासाठी शिवडी न्हावा शेवा मार्ग हा प्रकल्प आहे. अटल सागरी सेतू 21.8 किमी लांबीच्या या मार्गावरुन अवघ्या 15 मिनिटांत मनी मुंबईत पोहोचता येते. त्यामुळं प्रवाशांचा वेळदेखील वाचतो. पण ईस्टर्न फ्री वे आणि अटल सेतूवरुन दक्षिण मुंबईत येणाऱ्या वाहनांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळं दक्षिण मुंबईतील काही मार्गांवर मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक जॅम होत आहे. वाहतुक कोंडीची ही समस्या सोडवण्यासाठी काही बदल करण्याचा निर्णय वाहतुक विभागाने घेतला आहे. 

वाहतुकीस पर्यायी मार्ग असे आहेत?

सरदार वल्लभभाई पटेल रोड (एस. व्ही. पी. रोड) उत्तर वाहिनीवरील वाहतूक वाडीबंदर जंक्शन येथून डावे वळण घेऊन वाहने मायलेट बंदर (स्लिप रोड) येथे यू टर्न घेऊन पी. डिमेलो रोडने (दक्षिण वाहिनी) पुढे कर्नाक बंदरमार्गे जाऊ शकतील. येथून सीएसएमटी गेट क्रमांक १८, अवतार सिंग बेदी चौक, कुलाबा कफ परेड इत्यादी ठिकाणी जाता येते. एस. व्ही. पी. रोड, उत्तर वाहिनीवरून वाडीबंदर जंक्शन येथून उजवे वळण घेण्यास २४ तासांकरिता पुढील १८० दिवसांपर्यंत निर्बंध घालण्यात आले आहेत.