Mumbai News : राज्यात मागच्या काही वर्षांमध्ये दळणवळणाच्या साधनांमध्ये इतकी प्रगती झाली की पाहता पाहता दूर असणारी ठिकाणंही जवळ आली. बारा ते चौदा तासांवरचा प्रवास सहा ते सात तासांवर आला. नाशिक म्हणू नका किंवा नागपूर, मुंबईतून निघून अवघ्या काही तासांमध्ये हा प्रवास कसा सुखकर होईल यासाठीच यंत्रणा काम करताना दिसल्या. आश्चर्याची बाब म्हणजे राज्य प्रशासनाच्या वतीनंही दळवणळणाच्या क्षेत्रातील या प्रगतीला वाव देण्यात आला असून, आता एसटी महामंडळी या प्रवाहात आल्याचं स्पष्ट होत आहे.
राज्यातील कानाकोपऱ्यात असणाऱ्या खेड्यापाड्यांपर्यंत सहजपणे पोहोचवणारी एसटी आता आधुनिक तंत्रज्ञानाच्या बळावर आणखी प्रगत होत असून, यामुळं प्रवाशांनाही प्रवासाचा सुखकर अनुभव घेता येत आहे. अशा या एसटी महामंडळानं नुकताच 5150 इलेक्ट्रिक बस घेण्याचा धाडसी निर्णय घेतला. या नव्या एसटीसाठी राज्यात 173 हून जास्त बस स्थानकांमध्ये चार्जिंगचीही व्यवस्था करण्यात येत आहे.
महामंडळाच्या या नव्या एसटी बोरिवली- ठाणे- नाशिक मार्गावर धावणार असून, या मार्गावरील बस भाडं हिरकणी बसइतकंच असणार आहे. एसटी महामंडळाची ही 34 आसनांनी क्षमता असणारी बस मुंबई ते नाशिक असा प्रवास करणार असून, त्यामध्ये महिलांना 50 टक्के तर, 65 ते 75 वर्षांपर्यंतच्या नागरिकांना 50 टक्के आणि अमृत ज्येष्ठ नागरिक श्रेणीतील प्रवाशांना अर्थात 75 वर्षांवरील प्रवाशांना तिकीट दरात 100 टक्के सवलत देण्यात येत आहे.
एकदा चार्ज केल्यानंतर साधारण 200 किमी चालणाऱ्या या बसची बॅटरी अवघ्या दोन तासांमध्येच फुल चार्ज होते. तर, या बस प्रवासासाठी बोरिवलीहून नाशिक गाठण्यासाठी प्रवाशांना 405 रुपये इतकं भाडं भरावं लागतं. ठाण्याहून याच प्रवासासाठी 340 रुपयांचं तिकीट मिळतं. त्यामुळं किमान दरात आता आरामदायी प्रवास करणं सहज शक्य होणार असंच म्हणावं लागतंय.
एसटीच्या बोरिवली- ठाणे- नाशिक मार्गावर चालणाऱ्या बसच्या तिकीटासाठी तुम्ही http://www.msrtc.maharashtra.gov.in या संकेतस्थळाला भेट देऊ शकता. अन्यथा MSRTC च्या मोबाईल आरक्षण अॅपवरूनही तुम्ही तिकीट काढू शकता. काय मग? तुम्ही या मार्गावर कधी प्रवास करताय?