नागपूर: विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहाचे कामकाज सुरळीत पार पडेल, शिवसेना आमच्या बरोबर राहील, असा विश्वास संसदीय कामकाजमंत्री गिरीश बापट यांनी व्यक्त केला आहे. नागपूरात अधिवेशन होत असल्यानं विदर्भातील प्रश्नांवर जास्तीत जास्त चर्चा होऊन अनेक प्रश्न मार्गी लागतील, अशी आशाही बापट यांनी व्यक्त केली आहे.
राज्याच्या पावसाळी अधिवेशनाला नागपुरात आजपासून सुरुवात झालीय. शेतकरी कर्जमाफी, वाढत्या कर्जामुळे कोलमडले आर्थिक व्यवस्थापन यामुळे युती सरकारला याही अधिवेशनात पुरवण्या मागण्या मांडाव्या लागणार आहेत. या मागण्या आता किती हजार कोटींच्या असतील हे बघणे महत्त्वाचे ठरणार आहे. आज होणाऱ्या दिवसभराच्या कामकाजात पुरवणी मागण्यांव्यतिरिक्त काही विधेयके चर्चेसाठी पटलावर ठेवली जाणार आहेत. दोन्ही सभागृहात विविध संसदीय आयुधं वापरत विरोधी पक्ष कोणते मुद्दे उपस्थित करत सत्ताधारी भाजप - सेनेला कोंडीत पकडतात हे बघणे महत्त्वाचे ठरणार आहे.
दरम्यान, पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी नागपूर बंद हाक दिल्यानंतर सकाळपासूनच रस्त्यावर उतरून नागरिक बंदचं आवाहन करत आहेत. वेगळ्या राज्याच्या मागणीसाठी विदर्भ राज्य आंदोलन समितीने ही हाक दिली आहे. नागपूर बंदकरता शहरातील विविध भागातून पदयात्रा काढण्यात येत असून सीताबर्डीला सर्व विदर्भवादी आंदोलक एकत्र येणार आहेत. दरम्यान विदर्भातील इतर शहरातून आंदोलक नागपुरात पोहचत असल्याचं सांगताना अनेक ठिकाणी पोलिसांनी त्यांच्या गाड्या शहराबाहेर रोखल्याचा आरोपही विदर्भवाद्यांनी केला आहे. तर व्हरायटी चौकात निदर्शने करणाऱ्या विदर्भ वाद्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय.