अमर काणे, झी मीडिया, नागपूर : नागपुरमध्ये पुन्हा गुन्हेगारीने डोकं वर काढलं आहे. नागपुरच्या वाठोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत दुहेरी हत्याकांडाने खळबळ उडाली आहे. नवनियुक्त पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल यांनी पदभार घेऊन 24 तास उलटत नाही तोच नागपुरात वाठोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत दुहेरी हत्याकांड घडलं आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी दोन आरोपींवर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.
दुचाकी विकत घेऊन त्याचे हप्ते भरण्याच्या झालेल्या वादातून हा प्रकार घडल्याचे समोर आलं आहे. पैसे परत न दिल्याचा वाद विकोपाला जाऊन खून केल्याची घटना घडली. कृष्णकांत भट आणि सनी सरुडकर अशी मृतकाची नाव आहेत. किरण शेंडे आणि योगेश शेंडे यांच्यासह दोन साथीदार यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. किरण आणि योगेश हे दोघे भाऊ आहेत. तर कृष्णकांत आणि सनी हे व्याजाने पैसे देण्याचे काम करतात. कृष्णकांत याने किरण शेंडेंला गाडी विकत घेण्यासाठी पैसे दिले होते. पण किरण हफ्ते भरत नसल्याने त्याच्यांत वाद होत होता. शुक्रवारी रात्री वाद मिटवण्याची चर्चा सुरू असताना अचानक जोरदार भांडण झाले. याच भांडणात शेंडेंनी कृष्णकांत आणि सनीला गंभीर माराहान केली. या मारहाणीत दोघांचा मृत्यू झाला.
वर्ध्यात आईच्या डोक्यात वरवंटा घालून केली मुलाने हत्या
आर्वी तालुक्यातील काचनुर येथे मुलाने आईची हत्या केलीय. एका महिलेसोबत अनैतिक संबंध ठेवण्याला विरोध केल्याने मुलाने हत्या केल्याची माहिती पुढं आलीय. आईच्या डोक्यात दगडी वरवंटा घालून मुलाने हत्या केली. खरांगणा (मोरांगणा) पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपी मुलास ताब्यात घेतलं. घटनेत आईचा मृत्यू झाला असून मृतक महिलेचे नाव मीरा मुरलीधर पुसदकर असे आहे. मुलाचे महिलेशी अनैतिक संबंध असल्याने कुणकुण आईला लागली होती. त्यास आईने विरोध केला. मात्र मुलगा सोपान मुरलीधर पुसदकर याने आईशी भांडण करत डोक्यावर वरवंटा घातला. यात आईचा मृत्यू झाला.
यवतामळमध्ये खुनाच्या दोन घटना
यवतमाळ जिल्ह्यात आर्णी व पांढरकवडा तालुक्यात दोन खुनाच्या घटना घडल्या. दारूच्या नशेत सासरा शिवीगाळ करत असल्याने जावयाने काठीने डोके फोडून सासऱ्याचा खून केला. ही घटना आर्णी तालुक्यातील म्हसोला येथे गुरुवारी रात्री घडली. तर, पांढरकवडा शहरापासून सात किलोमिटर अंतरावर असलेल्या वाई फाट्याजवळ तरुणावर लाकडी दांड्याने मारहाण करून खून करण्यात आला.