नागपूर : नागपूर मेट्रोची ताशी 90 किलोमीटर प्रति तासाच्या वेगानं धावण्याची यशस्वी चाचणी घेण्यात आली. RDSOच्या चमूसमोर नागपूर मेट्रोच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ही चाचणी पार पडली. नागपूर मेट्रोच्या खापरी ते न्यू एअरपोर्ट या पहिल्या 5 किमीच्या टप्प्याचं काम पूर्ण झालं असून त्यावर गेल्या काही दिवसांपासून मेट्रो 25 ते 50 किमीच्या वेगानं धावत होती. आता मेट्रोची गती वाढविण्यात येत असून 90 किमी प्रतितासच्या वेगाची चाचणी घेण्यात आली. यावेळी सर्व तांत्रिक बाबी तपासण्यात आल्या.
मेट्रो चालत असताना ती किती व्हायब्रेट होते, वेगात धावत असताना काही अडचणी येतात का या सगळ्या बाबींच निरीक्षण या टीमनं केलं. आता प्रमाणपत्र मिळताच मेट्रो ताशी 90 किलोमीटरच्या वेगानं धावायला लागेल असा विश्वास महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक ब्रजेश दीक्षित यांनी व्यक्त केला आहे.