अन्यायकार बदली केल्याचा आरोप करत पोलिसाचा आत्मदहनाचा इशारा

 समाजमाध्यमांमध्ये हे पत्र व्हायरल झाल्यानंतर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे लक्ष

Updated: Jan 27, 2020, 03:37 PM IST
अन्यायकार बदली केल्याचा आरोप करत पोलिसाचा आत्मदहनाचा इशारा  title=

श्रीकांत राऊत, झी मीडिया, नागपूर : नागपूरच्या हुडकेश्वर पोलीस ठाण्यात कार्यरत एका पोलीस कर्मचाऱ्याने आपली कोणतेही कारण नसताना अन्यायकारक बदली केल्याचा आरोप करीत थेट वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना पत्र लिहून आत्मदहनाचा ईशारा दिल्याने पोलीस वर्तुळात खळबळ उडाली आहे. समाजमाध्यमांमध्ये हे पत्र व्हायरल झाल्यानंतर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी या  प्रकरणात लक्ष घातले आहे. 

पोलीस हवालदार संदीप गुंडलवार हे नागपूरच्या हुडकेश्वर पोलीस ठाण्यात डीबी पथकामध्ये कार्यरत आहेत. गुंडलवारांनी लिहिलेले पत्र सध्या समाजमाध्यमांवर व्हायरल होत आहे. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या दबाव तंत्रामुळे विनाकारण बदली करण्यात आली असून आपल्यावर अन्याय होत असल्याचे त्यात म्हटले आहे. तसेच हुडकेश्वर पोलीस ठाण्यात आपण आत्मदहन करण्याचे ठरविले असल्याचा ईशारा देखील या पत्रात देण्यात आला आहे. 

प्रजासत्ताक दिनी हे पत्र पोलीस ठाण्यात देण्यात आले. शिवाय समाजमाध्यमांवरही ते व्हायरल झाल्याने पोलीस विभागात एकच खळबळ उडाली. लुटमारीच्या एका गुन्ह्यातील अज्ञात आरोपीचा अहोरात्र शोध घेत असतानाच अचानक आपली २५ जानेवारीच्या आदेशान्वये सह पोलीस आयुक्तांनी बदली केल्याने आपण अतिशय तणावात असल्याचे संदीप गुंडलवार यांनी नमूद केले आहे. राज्याच्या गृहराज्यमंत्र्यांच्या गृहजिल्ह्यात पोलिसाने केवळ बदली केली म्हणून आत्मदहनाची परवानगी मागितल्याने, पत्र मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी थेट हुडकेश्वर पोलीस ठाण्यात जाऊन चौकशी सुरु केली आहे. 

आपण २८ जानेवारीला पोलीस ठाण्यात आत्मदहन करणार असून तशी परवानगी द्यावी अशा आशयाचे हे ईशारा देणारे पत्र एका पोलीस कर्मचाऱ्याने लिहिणे उचित नाही असे डीसीपी निर्मला देवी यांनी सांगितले. पोलीस खाते हे शिस्तबद्ध खाते म्हणून ओळखले जाते त्यामुळे येथे शिस्तीच्या चौकटीतच काम करावे लागते, पोलीस सेवेत येताना जेथे नियुक्ती होईल तेथे कर्तव्य बजावणे हे क्रमप्राप्त आहे मात्र केवळ एका पथकातून पोलीस मुख्यालयात बदली आदेश निघाल्याने अस्वस्थ होण्याचे कारण नसल्याचे त्या म्हणाल्या.  त्यामुळे चुकीचा पायंडा पडू शकतो. तूर्तास या प्रकरणात गांभीर्याने लक्ष घातले असून पोलीस हवालदार संदीप संदीप गुंडलवार यांचे म्हणणे ऐकून घेऊन चौकशीअंती पुढील कारवाई करणार असल्याचे डीसीपींनी सांगितले. 

हुडकेश्वर पोलीस ठाण्यात नव्याने रुजू झालेले पोलीस निरीक्षक आणि कर्मचाऱ्यांमध्ये वाद असल्याचे समजते. शिवाय वाढत्या चेनस्नॅचिंग आणि लुटमारीच्या घटना पाहता पोलीस पथकांच्या कर्तव्यावरही प्रश्नचिन्ह लागले आहे. त्यामुळे अंतर्गत कलहामुळे पोलीस दलाची नाचक्की होत असून नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना कायम आहे.