नागपूर : मकर संक्रांतीला तिळगूळ देऊन एकमेकांना शुभेच्छा दिल्या जातात.
पण मकर संक्रांतीला पतंग उडवण्यासाठी वापरला जाणारा नायलॉनचा मांजा अनेक अपघातांना कारणीभूत होतोय. नायलॉन मांजाविरोधात जनजागृतीलाही सुरूवात झालीय. त्याचे सकारात्मक परिणाम दिसून येत आहेत. नागपूरच्या स्मिता मिरे या गेल्यावर्षी नायलॉन मंजामुळे जखमी झाल्या. अंबाझरी परिसरात पतंगाच्या मांजामुळे त्यांच्या गळा आणि हाताला इजा झाली. दुचाकीची गती कमी असल्याने झालेला प्रसंग थोडक्यात निभावला. आता नायलॉन मांजा न वापरण्याबाबत स्मिता मिरे जनजागृती करत आहेत.
स्मिता मिरे अपघातातून थोडक्यात बचावल्या असल्या तरी काही जणांचा यामुळे जीवही गेलाय. दरवर्षी प्राणीपक्षीही मोठ्या प्रमाणात मांजामुळे जखमी होतात. मकर संक्रांतीला प्रचंड प्रमाणात पतंग उडवण्यात येतात...त्यामुळे नायलॉन मांजावर महापालिकेनेही बंदी घातलीय. याच्या अंमलबजवाणीसाठी महापालिकेच्या दहाही झोनमध्ये विशेष पथक तैनात करण्यात आली आहेत. पोलिसांनीही विक्रेत्यांवर गुन्हे दाखल करण्याचा इशारा दिलाय.
असे असले तरी खरी गरज आहे ती पतंग उडवणाऱ्या नागरीक आणि शौकिनांच्या जागृतीची.कारण सध्या कॉटन धाग्यापेक्षा नायलॉन मांजाला नागरिकांची जास्त पसंती असल्याचे पतंग विक्रेत्यांचे म्हणणे आहे. मात्र स्वतःच्या क्षणिक आनंदासाठी दुसऱ्याचा जीव धोक्यात घालणं प्रत्येकाने टाळायला हवं.