बटाट्याचं गाव! कमी पाण्यात, कमी खर्चात फायदेशीर बटाटा शेती

नक्की कुठे आहे हे गाव, एकदा पाहाच...

Updated: Feb 27, 2020, 07:57 AM IST
बटाट्याचं गाव! कमी पाण्यात, कमी खर्चात फायदेशीर बटाटा शेती title=

मुस्तान मिर्झा, झी मीडिया, उस्मानाबाद : उस्मानाबाद जिल्ह्यातील बटाट्याचं गाव...इथं ७५ टक्के शेतकरी केवळ बटाट्याची शेती करतात. आणि या शेतीच्या जोरावर ते चक्क लक्षाधीश झाले आहेत.

उस्मानाबाद जिल्ह्यातलं नागझरवाडी गाव. या गावाची लोकसंख्या जेमतेम दीड हजार आहे. बटाट्याचं गाव ही त्याची नवी ओळख. कारण गेल्या सात वर्षांपासून या दुष्काळी गावातले शेतकरी बटाट्याची शेती करत आहेत. गावात तीनशे-चारशे एकर क्षेत्रात फक्त बटाटेच घेतले जातात. बटाट्यांच्या पिकामुळे इथले अनेक शेतकरी लक्षाधीश झाले आहेत.

फक्त ९० दिवसांत बटाट्याचे पैसे हाती येतात. शिवाय बटाट्याला पाणीही कमी लागतं. त्यामुळं एकरी ३० ते ४० हजार रुपये गुंतवले तरी फक्त ९० दिवसात दीड ते दोन लाख रुपयांचं उत्पन्न मिळतं...

बटाट्याचं सर्वाधिक पीक पुणे जिल्ह्यातल्या मंचर गावात घेतलं जातं. तिथून सामूहिकपणे शेतकरी बियाणं घेऊन येतात. सरकारने गावाजवळच बियाण्यांचा प्लॉट तयार केला तर आणखी फायदा होईल, असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे.

बटाट्याला ना सरकारी अनुदान मिळतं, ना पीकविम्याचा लाभ मिळतो. बटाटा लागवडीला बँकाही कर्ज देत नाहीत. जर हे लाभ मिळाले तर अधिकाधिक शेतकरी बटाटा पिकवून नफा कमवतील.