Uddhav Thackeray meets CM Devendra Fadnavis : उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांची भेट घेतल्यानंतर शिवसेना UBT आणि भाजपमधील दुरावा कमी होत असल्याचं चित्र पाहायला मिळतंय. उद्धव ठाकरे यांच्या भेटीनंतर आता ठाकरेंच्या आमदारांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. त्यामुळे ठाकरे फडणवीसांमधील दरी कमी झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
शिवसेना UBTचे वांद्रे पूर्वचे आमदार वरूण सरदेसाई यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. वरुण सरदेसाईंच्या मतदारसंघात सरकारी वसाहतीतील कर्मचा-यांची निवासस्थानं आहेत. त्या प्रश्नासंदर्भात सरदेसाईंनी फडणवीसांशी चर्चा केली. त्यानंतर विधान परिषदेचे शिवसेना UBTचे आमदार अनिल परब यांनीही सरकारी कर्मचा-यांच्या प्रश्नाविषयी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली.
इतकचं नव्हे तर ॉशिवडीचे आमदार अजय चौधरी यांनीही मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन मुंबईतील सातशे चौरस फुटांपर्यंतच्या घरांना मालमत्ता कर माफ करावा, या मागणीचं निवेदन दिलं. विशेष म्हणजे विधान परिषद सभापती निवडणुकीतही नीलम गो-हे यांच्या अपात्रतेचा मुद्दा उपस्थित शिवसेना UBTनं उपस्थित केला होता. तसंच भाजपचे राम शिंदे सभापती व्हावेत, यासाठी त्यांनी अप्रत्यक्ष मदतही केली होती.
एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रिपदाच्या कार्यकाळात मुख्यमंत्री कार्यालयाकडं एकदाही न फिरकलेले शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार आता फडणवीसांच्या गाठीभेटी घेऊ लागलेत. उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर शिवसेना ठाकरे गट आणि भाजपमधील दुरावा कमी होत असल्याचं चित्र पाहायला मिळतंय. उद्धव ठाकरेंनी भेट घेतल्यानंतर दोनच दिवसात ठाकरे गटाच्या आमदारांनीही देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. शिवसेना उद्धव बाळासाहेब पक्षाचे आमदार वरूण सरदेसाई, अनिल परब आणि अजय चौधरी यांनी गुरूवारी फडणवीसांची भेट घेतलीय. मतदारसंघातल्या अतीमहत्वाच्या कामांसाठी फडणवीसांची भेट घेतल्याचा दावा ठाकरेंच्या आमदारांनी केलाय.
एकनाथ शिंदे हे अडिच ते तीन वर्षांपूर्वी उद्धव ठाकरेंच्याच पक्षात होते.. मात्र शिवसेनेच्या फुटीनंतर उद्धव ठाकरे आणि शिंदेंमध्ये एवढे मतभेद निर्माण झालेत की ठाकरेंच्या पक्षाला फडणवीस जवळचे वाटू लागलेत. राजकारणात कोण कुणाचा कायमचा मित्र नसतो आणि कोण कुणाचा कायमचा शत्रूही नसतो. जर उद्धव ठाकरे फडणवीसांची भेट घेऊ शकतात तर त्यांच्या पक्षांच्या आमदारांनी फडणवीसांची भेट घेतल्यास त्यात वावगे ते काय? असा सवाल विचारला जाऊ लागलाय. पण ठाकरेंच्या आमदारांच्या वाढलेल्या या फेऱ्यांमुळे शिंदेंच्या आमदारांच्या मात्र पोटात गोळा आलाय.