मोबाईलवरुन सख्ख्या भावांचं भांडण, करणने अर्जुनची गळा आवळून केली हत्या

मोबाईल हा आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनला आहे. मोबाईलने सख्खी नातीही संपवलीत. अशीच एक दुर्देवी घटना नांदेडमध्ये घडली असून केवळ मोबाईलसाठी भावानेच सख्ख्या भावाची हत्या केली. 

सतिश मोहिते | Updated: Jun 27, 2023, 09:42 PM IST
मोबाईलवरुन सख्ख्या भावांचं भांडण, करणने अर्जुनची गळा आवळून केली हत्या title=

सतीश मोहिते, झी मीडिया, नांदेड : अन्न, पाणी निवारा या माणसाच्या आयुष्यातील मुलभूत गरजांबरोबरच आता मोबाईलही (Mobile) आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनलाय. लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत जवळपास प्रत्येकाकडे मोबाईल आहे. मोबाईलशिवाय दिवसच काय तर काही सेकंदही आपण दूर राहू शकत नाही. पण याच मोबाईलमुळे नात्या-नात्यांमध्ये दुरावा निर्माण झाला आहे. मोबाईलमुळे जगभरात आपले मित्र झालेत, पण घरातल्या लोकांना आपण विसरलो आहोत. मोबाईलमुळे सख्खे नातेवाईक (Relatives) एकमेकांच्या जीवावर उठलेत. अशीच एक धक्कादायक घटना नांदेडमध्ये (Nanded) उघडकीस आली आहे. 

सख्ख्या भावांचं भांडण
मोबाईलवरुन करण आणि अर्जुन या दोघा भावांमध्ये वाद झाला आणि संतापाच्या भरत करणने अर्जुनचा गळा आवळून खून केला. नांदेड मध्ये ही धक्कादायक घटना घडली. 23 वर्षीय करण गवळे आणि 20 वर्षीय अर्जुन गवळे दोघे भाऊ आपल्या कुटुंबासोबत गोपाळचावडी भागात राहतात. काल रात्रीच्या सुमारास लहान भाऊ अर्जुनने काही कामासाठी मोठा भाऊ करणचा मोबाईल मागितला. पण करणने अर्जुनला मोबाईल दिला नाही. मोबाईल न दिल्याने दोघा भावांमध्ये वाद होऊन हाणामारी झाली.  त्याने करणने अर्जुनला खाली पाडून  साडीने त्याचा गळा आवळला. यात अर्जुनचा जागीच मृत्यू झाला.  या प्रकरणी सिडको ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय.

ट्रकने विद्यार्थ्याला चिरडलं
दरम्यान, नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर भोकर रोडवर भरधाव ट्रकने अकरावीमध्ये शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीला चिरडले. मोरगाव इथल्या पूजा चिरपकटलेवार ही तरुणी भोकर इथल्या महाविद्यालयात जाण्यासाठी निघाली होती. बस स्टॉप वर जात असताना भरधाव ट्रकने तिला चिरडले. डोक्यावरून ट्रकचे टायर गेल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर ट्रक चालक फरार झाला होता. पण पोलीसांनी पाठलाग करून ट्रकचालकाला अटक केली.

अपघातात 16 वर्षांच्या मुलाचा मृत्यू
नाशिकमध्येही अपघाताची अशीच भीषण घटना घडली. नाशिकच्या सातपूर अंबड लिंक रोडवर दुचाकीच्या अपघातात एका 16 वर्षीय मुलाचा मृत्यू झाला. सार्थक दामू राहणे असं मयताचं नाव असून जाधव संकुल परिसरातील तो रहिवासी होता. सकाळी सात वाजेच्या सुमारास सार्थकसह दोन मित्र दुचाकीवरून क्लासला जात असतांनाच त्यांची दुचाकी स्लिप झाली. आणि रस्त्यालगत असलेल्या डिव्हाइडरला धडकली यात सार्थक गंभीर जखमी झाल्याने त्याचा मृत्यू झाला. तर इतर दोघांवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हे तिघेही दहावीचे विद्यार्थी होते, पालकांनी आपल्या अल्पवयिन मुलांच्या हाती वाहन देतांना विचार करण्याची गरज असल्याचं यातून दिसून येतंय..

निफाडमध्ये तिघांचा मृत्यू
निफाड तालुक्यातील शिरवाडे फाटा इथं रात्रीच्या सुमारास बस आणि दुचाकीमध्ये अपघात होऊन यात दुचाकीवरील तीन जण ठार झाल्याची घटना घडली. त्या अपघाताच्या निषेधार्थ शिरवाडे सह परिसरातील गावातील नागरिक संतप्त होत त्यांनी मुंबई आग्रा महामार्ग रोखत रस्ता रोको आंदोलन केलं. या ठिकाणी गतिरोधक बसवावे अशी मागणी संतप्त ग्रामस्थांकडून होत आहे. गतिरोधक बसवतनाही तोपर्यंत तरुणांचे मृतदेहांवर अंत्यविधी करणार नाही, असा पवित्रा संतप्त ग्रामस्थांनी घेतला होता.