नांदेड : भाजपचा बहर आता ओसरला असून, त्यांचा परतीचा प्रवास सुरु झाला आहे. या प्रवासाची सुरूवात नांदेडमधूनच सुरू होईल, असे ठासून सांगत राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि कॉंग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी नांदेड महापालिका निवडणूक प्रचाराचे रणशिंग फुंकले.
येत्या ११ ऑक्टोबरला नांदेड महापालिकेसाठी निवडणूक पार पडत आहे. नांदेड हा अशोक चव्हाण आणि पर्यायाने कॉंग्रेसचा बालेकिल्ला आहे. भाजपचा आक्रमक प्रचार, कॉंग्रेसविरूद्द जनतेच्या मनात असलेली अॅन्टिइन्कब्मंन्सी तसेच, नरेंद्र मोदींचा झंजावत असूनही लोकसभा आणि विधानसभा निवडणूकीत या बालेकिल्ल्याला धक्का लागला नव्हता. त्यामुळे काहीही करून महापालिका निवडणुकीत तरी, कॉंग्रेसला धक्का द्यायचाच, या विचाराने भाजपने नांदेडमध्ये ताकद लावली आहे. या आव्हानाचा सामना करण्यासाठी मुरब्बी अशोक चव्हाण यांनीही मोर्चेबांधनी केली असून, प्रत्यक्ष कामालाही सुरूवात यांनी हाती घेतली आहेत.
महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेसने आपला जाहिरनामाही प्रकाशित केला. या वेळी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, माजी खासदार भालचंद्र मुणगेकर, काँग्रेसचे प्रवक्ते रत्नाकर महाजन आदी मान्यवर ऊपस्थीत होते. जाहिरनामा प्रकाशनाच्या वेळी अशोक चव्हाणांनी भाजपावर टिकास्त्र सोडलं. लोकसभा निवडणुकीत भाजपाचे पंतप्रधानपदाचे ऊमेदवार नरेंद्र मोदी यांनी नांदेड मध्ये सभा घेतली होती. पण त्यावेळी 80 हजारांच्या मताधिक्याने आपण निवडून आल्याचे चव्हाण म्हणाले. आता भाजपाच्या परतीचा प्रवासही नांदेड मधुन सुरू होईल असा आत्मविश्वास चव्हाणांनी व्यक्त केला.