बाजार समिती निवडणुकीत खासदार मेव्हण्याला आमदाराने केले चितपट; दंड थोपटून दिलं आव्हान

Nanded News : नांदेड जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुकीत भाजपाचा पराभव झाला असून पुन्हा एकदा आमदाराने खासदाराला पराभूत केलं आहे.खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांचा आमदार श्यामसुंदर शिंदे यांनी पराभव केला आहे.

सतिश मोहिते | Updated: Oct 9, 2023, 09:33 AM IST
बाजार समिती निवडणुकीत खासदार मेव्हण्याला आमदाराने केले चितपट; दंड थोपटून दिलं आव्हान title=

सतिश मोहिते, झी मीडिया, नांदेड : राजकरणात रक्ताची नाती एकमेकांचे शत्रू बनतात अशी अनेक उदाहरणं आहेत. असेच एक उदाहरण नांदेड (Nanded News) जिल्ह्यात सध्या सर्वत्र चर्चेत आहे. मेहुणे असलेले भाजपाचे (BJP) खासदार प्रताप पाटील चिखलीकर (MP Pratap Patil Chikhalikar) आणि त्यांचे दाजी म्हणजे भाऊजी असलेले आमदार श्यामसुंदर शिंदे (MLA Shyamsundar Shinde) यांच्यातील संबंध पार विकोपाला गेले आहेत. तर नांदेड जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुकीत भाजपाचा पराभव झाला आहे. सहा बाजार समित्यांच्या निवडणुकीत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने 13 जागांवर विजय मिळवला आहे.

लोहा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत आमदार श्यामसुंदर शिंदे यांच्या पुढाकाराने महाविकास आघाडीने 18 पैकी 16 जागा जिंकल्या तर खासदार प्रताप पाटील यांना केवळ 2 जागांवर समाधान मानावे लागले. मग काय शेतकरी कामगार पक्षाचे आमदार असलेले श्यामसुंदर शिंदे यांच्या समर्थकांनी धुमधडाक्यात विजयी रॅली काढली. आमदार श्यामसुंदर शिंदे यांनी रॅलीत दंड आणि मांडी अनेकवेळा थोपटून खासदार चिखलीकर यांना डिवचले. 

खासदार चिखलीकर यांचे नाव घेऊन आमदार शिंदे यांनी त्यांना भस्मासुर, मटका, दारूचे हफ्ते घेणार एव्हढेच काय तर चोर संबोधले. खासदार चिखलीकर यांनी केव्हा केव्हा चोरी केली लाईव्ह डिटेक्टर टेस्ट करा मी सिद्ध करतो, सिद्ध केले नाही तर राजकरण सोडतो अशी जाहीर प्रतिक्रीया आमदार शिंदे यांनी व्यक्त केली. खासदार चिखलीकर यांना कोणतीच निवडणूक जिंकू देणारा नाही, मी खराखुरा पैहलवान आहे, हा तर चिंधीचोर आहे असे शब्द वापरून याला लाथेने मारून चित करतो असे आमदार शिंदे म्हणाले आहेत.

दरम्यान, नांदेड जिल्ह्यातील माहूर, बिलोली, कुंडलवाडी, उमरी, मुखेड आणि लोहा या सहा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीचे निकाल रविवारी जाहीर करण्यात आले. या बाजार समित्यांत भाजपाचा पराभव झाला. कुंडलवाडी, बिलोली व उमरी येथे महाविकास आघाडीने यश मिळवले आहे. तर माहूर येथे राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, माकप आघाडीने विजय मिळवला आहे. मुखेडमध्ये भाजपाने एकूण 18 जागांपैकी 17 जागांवर विजयी मिळविला तर एका जागेवर काँग्रेसने विजय मिळवला.