Nanded Crime News: खंडणी स्वीकारण्यासाठी आलेल्या गुन्हेगाराने पोलिसांवर (Firing On Police) गोळीबार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. तर, पोलिसांनीही तेवढ्याच ताकदीने या हल्लेखोरांना प्रतिउत्तर दिलं आहे. मात्र या घटनेने नांदेड (Nanded) शहरात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांवर हल्ला करण्यापर्यंत गुन्हेगारांची मजल या घटनेची चांगलीच चर्चा रंगली आहे.
पोलिसांवर गोळीबार करणाऱ्या तीन आरोपींना अटक केली आहे. धक्कादायक म्हणजे खंडणीखोरांमध्ये एका महिलेचाही समावेश आहे. नांदेड शहरापासून जवळ असलेल्या ढाकनी शिवारात शुक्रवारी संध्याकाळी ही घटना घडली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कंत्राटदार तेजस लोहिया यांच्याकडे आरोपींकडून एक कोटी रुपयांची खंडणी मागण्यात आली होती. त्यानंतर काल गुरुवारी 2 लाख रुपये देण्यास अज्ञात खंडणीखोरानी सांगितले होते. आरोपींच्या धमकीबाबत लोहिया यांनी पोलिसांना माहिती दिली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचला होता.
लोहिया यांच्या ढाकनी शिवारातील गिट्टी क्रशरजवळ अज्ञात आरोपींनी पैसे देण्यासाठी बोलावण्यात आले होते. त्यानुसार पोलिसांनी तिथे सापळा लावला होता. आरोपींनी सांगितलेल्या पत्त्यावर आधीच साध्या वेशातील पोलीस हजर होते. पोलिस तिथे येणार असल्याची कोणतीच कल्पना नसल्याने खंडणीखोर टाटा हॅरियर या आलिशान गाडीतुन आले होते तर त्यांचा अन्य एक साथीदार दुचाकीवर होता.
खंडणीखोरांनी लोहिया यांच्याकडून पैसे घेतले व तिथून जाण्यासाठी निघताच पोलीस त्यांना पकडण्यासाठी पुढे आले. पुढील धोका ओळखून गाडीतील खंडणीखोरांनी पोलिसांवर गोळीबार केला. आरोपींच्या गोळीबारावर पोलिसांनीही प्रतिउत्तर देत गोळीबार केला. या गोळीबारात कोणीही जखमी झालेले नाहीये. घटनेचा पुढील तपास पोलिस करत असून खंडणीखोरांमध्ये एका महिलेचाही समावेश असल्याने नांदेडमध्ये खळबळ उडाली आहे. तीन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. तसंच, लोहिया यांच्याकडून घेतलेले पैसेही ताब्यात घेतले असून ते पुन्हा त्यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले आहेत.