नंदुरबार, धुळे जिल्ह्यात पुन्हा पूरस्थिती

नंदुरबार आणि धुळे जिल्ह्यात पुन्हा पूर परिस्थिती निर्माण झाली आहे.  

Updated: Aug 9, 2019, 01:22 PM IST
नंदुरबार, धुळे जिल्ह्यात पुन्हा पूरस्थिती  title=
संग्रहित छाया

धुळे : नंदुरबार आणि धुळे जिल्ह्यात पुन्हा पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. नंदुरबार जिल्ह्याला पुराचा सर्वाधिक फटका बसला आहे. गेल्या चोवीस तासांपासून संततधार पावसामुळे नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा, अक्कलकुवा, धडगाव, शहादा आणि नवापूर तालुक्यांना पुराच्या पाण्याचा जबर फटका बसला आहे. या आठवड्यात दुसऱ्यांदा नंदुरबार जिल्ह्याला पुराचा फटका बसला आहे. शहादा शहरातील महत्त्वाचे मार्ग हे जलमय झाले आहेत. 

मध्य प्रदेशची बस पुरात अडकली आहे. तर नवापूर शहरातील अनेक घरे मोडकळीस आली आहेत. रंगावली नदीसह जिल्ह्यातील प्रमुख नद्यांना पूर परिस्थिती कायम आहे. पुराचे पाणी वाढण्याची भीती देखील आहे. तर धुळे जिल्ह्यातील साक्री आणि पिंपळनेर भागात संततधार पावसामुळे पांझरा नदीला मोठा पूर आला आहे. लाटीपाडा आणि जामखेडी या धरणातून प्रचंड पाण्याचा विसर्ग केला जात असल्यामुळे धुळे शहरातून वाहणाऱ्या पांझरा नदीला पुन्हा मोठा पूर येणार आहे.

जिल्हा प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. तर तापी नदीत हतनूर धरणातून सुमारे दोन लाख क्युसेक पाण्याचा विसर्ग केला जात असल्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. बऱ्हाणपूर अंकलेश्वर महामार्ग काळापासून बंद करण्यात आहे.